मुंबई,
Big decision of Central Railway मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांसाठी उन्हाळ्यातील प्रवास आता सोपा होणार आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर शाळा उन्हाळी सुट्टीसाठी बंद असतात, आणि कुटुंबे गावी किंवा सहलीला जाण्याचा बेत आखतात. मात्र उन्हाळ्यातील गर्दीमुळे अनेकदा ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत आणि प्रवाशांना खासगी वाहनांचा अवलंब करावा लागतो. यामुळे मध्य रेल्वेने उन्हाळ्यातील प्रवाशांसाठी १४८४ विशेष गाड्या धाववण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ७४९ आरक्षित आणि ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.
या विशेष गाड्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यानच्या मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. यात मुंबई/दौंड ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, नाशिक रोड ते बडनेरा आणि हडपसर ते हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांसाठीही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत. मुंबई ते बलिया, मुंबई ते गोरखपूर, दौंड ते कलबुर्गी आणि सोलापूर ते कलबुर्गी/अनकापल्ली या मार्गांवर देखील गाड्या धाववल्या जाणार आहेत. या उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये मागणीनुसार आधीच चालवण्यात येणाऱ्या गाड्या आणि काही अतिरिक्त गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामासाठी विविध सुविधा वाढवत असून आपल्या नेटवर्कमध्ये अनेक उपाययोजना राबवत आहे. या विशेष गाड्यांच्या वेळापत्रक आणि थांब्यांची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. त्यात सीएसएमटी ते गोरखपूर, एलटीटी ते दानापूर, पुणे ते गोरखपूर आणि दानापूर ते पुणे या मार्गांवरील दैनिक विशेष गाड्यांचा समावेश आहे.या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना उन्हाळ्यातील प्रवासाचे नियोजन करता येईल आणि गर्दीमुळे निर्माण होणारी अडचण टाळता येईल.