वर्‍हाडी घेवून परत येत असलेल्या खासगी बसला अपघात

- एकाचा घटनास्थळावरच मृत्यू, ४ गंभीर - गोंदिया शहराजवळील कारंजा येथील पोलिस वसाहतीसमोरील घटना

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
bus accident मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील मैकेपार येथे लग्न सोहळा आटोपून गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे परत येत असलेल्या वराकडील मंडळीच्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अपघात होऊन एका वर्‍हाड्याचा जागीच मृत्यू झाला तर चार वर्‍हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवार १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा येथील पोलिस वसाहतीजवळ घडली.
 

बस अकॅसिडेंट  
 
 
सोनू घनशाम उईके (२७, रा. वाडी नागपूर) असे मृत वर्‍हाड्याचे तर हेमराज चौहाण (५०, रा. कवळीटोला), शोभा उदल पंधरे (७०, रा. कोहमारा), नैतीक शाम सिडाम (१४, रा. कोहमारा) आणि लक्ष्मी घनशाम उईके (६५, रा. वाडी नागपूर) असे गंभीर जखमींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील वरखडे कुटुंबातील मुलाचे मध्यप्रदेशातील खैरलांजी नजीक असलेल्या मैकेपार येथील मुलीशी लग्न जुळले होते. दरम्यान, ११ मार्च रोजी मोहाडी येथून वराकडील सर्व वर्‍हाडी अविनाश ट्रॅव्हल्स कंपनीच्या एमएच ०३, एन ९३५२ क्रमांकाच्या खासगी बसने मैकेपार येथे लग्नाला गेले होते. लग्न सोहळा आटोपून रात्रीच्या सुमारास ४५ वर्‍हाडी घेवून बस परतीच्या प्रवासाला निघाली असता पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास कारंजा येथील पोलिस वसाहती जवळ टरबूज भरलेल्या मालवाहकाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात ट्रॅव्हल्सची मालवाहकाला धडक बसली. यात ट्रॅव्हल्स चालकाचे स्टेअरींगवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील झाडांना धडक देत रस्त्याच्या खाली उतरली. ज्यामध्ये ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा संपूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेनंतर मात्र, चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सर्व वर्‍हाडी साखर झोपेत असताना अचानक घडलेल्या या घटनेने वर्‍हाड्यांमध्ये एकच धावपळ माजली. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खिडकीतून तातडीने बाहेर काढले.bus accident घटनेची माहिती मिळताच कारंजा येथील ग्रामस्थांनीही घटनास्थळ गाठून बचाव कार्यात मदत केली. यावेळी सोनू घनशाम उईके याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर हेमराज चौहाण, शोभा पंधरे, नैतीक सिडाम, लक्ष्मी घनशाम उईके हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात हलवून घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास सुरु आहे