गोंदिया जिल्ह्यात ‘गजराज रिटर्न’

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
- गोठणगाव परिसरात मका पिकाची नासधूस
- वनविभागाकडून गावांना सतर्कतेचा इशारा

अर्जुनी मोरगाव, 
'Gajraj Return' in Gondia तालुक्यात मागील काही वर्षांपासून हत्तींच्या कळपाचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत असून ११ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा हत्तींच्या कळपाने प्रवेश केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सुमारे २० ते २२ हत्तींचा कळप गोठणगाव वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात फिरताना आढळून आला असून परीसरातील मक्का पिकाची नासधूस केली असल्याची माहिती आहे. दरम्यान, वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असताना परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 
 
 
'Gajraj Return' in Gondia  गोठणगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी मिलिंद पवार यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जंगलाच्या दिशेने जाणे टाळावे. तसेच हत्तींच्या हालचालींवर वनविभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचारी सतर्क असल्याची माहिती त्यांनी दिली. हत्तींचा कळप शेतशिवारात घुसल्यास धान, मका, भाजीपाला तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी शेतात एकटे जाणे टाळावे व समूहानेच जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हत्ती दिसल्यास कोणतीही घाबरगुंडी न उडवता किंवा त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर अधूनमधून वाढत असल्याचे दिसून येत आहे. या कळपामुळे अनेकदा पिकांचे नुकसान झाले असून काही भागात नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही भीती वाटत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हत्तींच्या वाढत्या हालचालींवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, संरक्षणासाठी ठोस योजना राबवाव्यात तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत. वनविभागाने सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून हत्तींच्या कळपाच्या हालचालींची माहिती गावागावांत पोहोचवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.