...तर जिल्ह्यातील हॉटेल रेस्टारेंटसह शिवभोजनही होणार बंद !

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
- व्यवसायीक गॅस सिलींडर पुरवठा बंद झाल्याचा फटका
- हॉटेल व्यवसायीकांसह शिवभोजन संचालकांची धाकधूक वाढली

गोंदिया, 
Gas cylinder supply अखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाची झळ आता छोट्या शहरांनाही बसू लागली आहे. या युद्धाचे परिणाम एलपीजी गॅस सिलींडरच्या पुरवठ्यावर होऊ लागले असून घरगुती गॅस सिलींडर धारकांना गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी व्यवसायीक गॅस सिलींडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अवघ्या काही दिवसातच जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टारेंट बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सिलींडर तुटवड्याची झळ राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेलाही बसण्याची शक्यता असून शिवभोजन केंद्रदेखील गॅस सिलींडर अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
 
 
cylinder supply
 
Gas cylinder supply  शासनाकडून १० मार्च रोजी दिलेल्या सुचनेनुसार व्यवसायीक गॅस सिलींडरचा पुरवठा बंद करण्यात आला असून आपातकालीन सेवा म्हणून केवळ रुग्णालय व शैक्षणिक संस्थांना गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलींडरचा पुरवठा सामान्य असून यात केवळ थोडे बदल करून एका सिलींडरनंतर २१ दिवसांनी मिळणारे सिलींडर आता २५ दिवसानंतर मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विविध गॅस कंपनीचे २१ वितरक असून ३ लाख ४ हजार ७८८ ग्राहकांची नोंद आहे. ज्यामध्ये दरदिवशी ४ हजार ९५६ घरगुती गॅस धारकांना सिलींडरचा पुरवठा करण्यात येत असताना ७२ व्यवसायीक सिलींडरचा पुरवठा केला जातो. दरम्यान, जिल्ह्यात आजच्या तारखेत ९ हजार ८७ घरगुती सिलींडर उपलब्ध असताना केवळ १९५ व्यवसायीक सिलींडरचा साठा आहे. त्यात अनेक हॉटेल व्यवसायिकांकडे केवळ दोन ते चार दिवस चालेल एवढाच गॅसचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शाससनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेवरही याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. सिलींडर अभावी शिवभोजन केंद्र संचालकांना केंद्र चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे शिवभोजन संचालकांचीही धाकधूक वाढली असून जिल्ह्यातील सर्व ५१ शिवभोजन केंद्रही बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व प्रकारात शिवभोजन केंद्रात केवळ १० रुपयात आपली भूक भागविणार्‍या गोरगरीबांनाही या सिलींडर तुटवड्याची झळ सोसावी लागणार आहे.
 
 
निवेदन देणार ...
Gas cylinder supply  जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंंद्र असून दरदिवशी ५ ते ६ हजार लाभार्थी या शिवभोजन योजनेचा लाभ घेतात. अशात गॅस सिलींडरच्या तुटवड्यामुळे शिवभोजन केंद्र सुरू ठेवणे कठीण होणार आहे. तेव्हा आपातकालीन सेवा म्हणून शिवभोजन केंद्रांना गॅस सिलींडरचा पुरवठा सुरळीत ठेवावा. यासाठी शिवभोजन संचालक मंडळाकडून शासनाला तसे निवेदन देण्यात येणार आहे.
सौरभ रोकडे, शिवभोजन संचालक
 
 
कुठलेही प्रावधान नाही...
गॅस कंपन्यांकडून जिल्ह्यात नियमीत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलींडरचा मुबलक साठा आहे. व्यवसायिक गॅस सिलींडरच्या बाबतीत शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. तर शिवभोजन केंद्रासाठी वेगळे कोणतेही प्रावधान शासनाकडून करण्यात आलेले नाही.
- सतिश अगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया