सौंदड येथील ज्वेलर्स दुकानफोडी प्रकरण उघडकीस

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
- मध्यप्रदेशातील अट्टल चोर अटकेत, दोघे फरार
- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, 
Jewellers' shop robbery case सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे ज्वेलर्स दुकानात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून मध्यप्रदेशातील एका अट्टल चोराला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल ६ लाख ८१ हजार १८ रुपये किमतीचा सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, दोन आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.
 
 
Jewellers
 
Jewellers' shop robbery case पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदड येथील कृष्णा वार्डमध्ये राहणारे रविंद्र आनंदराव यावलकर (५५) यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील काउंटर ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे कंडी, डोरले, फॅन्सी टॉप्स, बॅटन टॉप्स, अंगडी, नाकातील खडे आदी ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने तसेच पायल, जोडवे, चैन, अंगठी, गणेश-लक्ष्मी मूर्ती यासह १ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. याचवेळी शेजारील ज्वेलर्स दुकानातूनही सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी यावलकर यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असताना तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील अट्टल चोरट्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक ९ मार्च रोजी पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथे रवाना करण्यात आले. तपासादरम्यान बलवानसिंग गब्बुसिंग भादा (३४), रा. शास्त्री वार्ड, पांढुर्णा याला ११ मार्च रोजी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने कुंदनसिंग जुनी (रा. पांढुर्णा) आणि चमन सहारे (रा. मुलताई, मध्यप्रदेश) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. मात्र इतर दोन्ही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपीच्या घरातून २ सोन्याचे तुकडे, ७ ग्रॅम सोन्याचे दागिने, २८८ ग्रॅम चांदीचे दागिने, चांदीचे ताट, १२ जोड पैरपट्टी, १० जोड कडे, ४१ अंगठ्या, देवी-देवतांच्या मूर्ती, बिछिया तसेच इतर चांदीचे साहित्य असा एकूण ६ लाख ८१ हजार १८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.