नवी दिल्ली,
job scam उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि प्रतापगड जिल्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीने वर्षानुवर्षे दोन सरकारी नोकऱ्या चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी जयप्रकाश सिंह याने दोन वेगवेगळ्या विभागात नियुक्त्या मिळवल्या आणि जवळजवळ १७ वर्षे दोन्हीकडून पगार घेतला.
प्रकरणाची उकल एका तक्रारीमुळे आणि माहिती अधिकार (RTI) चौकशीनंतर झाली. नंतर हा प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) सुधा सिंह यांनी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी, ३०,००० रुपये दंड आणि सरकारी तिजोरीतून घेतलेले वेतन वसूल करण्याचे आदेश दिले.
तपासात समोर आले की, जयप्रकाश सिंह यांची जून १९९३ मध्ये बाराबंकी जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, तर २६ डिसेंबर १९७९ रोजी प्रतापगड जिल्ह्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली होती. त्यांनी समान मार्कशीट आणि कागदपत्रांचा वापर करून दोन्ही नोकऱ्या मिळवल्या आणि दोन्हीकडून वेतन मिळवत राहिले.
सरकारी नियमांनुसार एका कर्मचाऱ्याला एका वेळी फक्त एकच सरकारी पद भूषवता येते. तरीही, जयप्रकाश सिंह यांची दुहेरी नोकरी जवळजवळ १७ वर्षे सुरु राहिली. हे प्रकरण कसे लपले, यावर प्रश्न उपस्थित झाला.
२० फेब्रुवारी २००९ रोजी प्रभात सिंह यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. आरटीआयद्वारे मिळालेल्या नोंदींवरून स्पष्ट झाले की, जयप्रकाश सिंह हे दोन्ही विभागांत एकाच वेळी नोंदणीकृत होते आणि पगार मिळवत होते.job scam चौकशी नंतर त्यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरीचे आरोप ठोठावले गेले, तसेच दोन्ही नोकऱ्यांमधून त्यांना निलंबित करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर आरोपी दोषी ठरवला गेला. बाराबंकीचे वरिष्ठ अभियोक्ता अधिकारी अनार सिंह यांनी सांगितले की, त्या काळी विभागीय नोंदी पूर्णपणे डिजिटल नव्हत्या, त्यामुळे अशी अनियमितता लपून राहिली. मात्र, आजच्या डिजिटल रेकॉर्ड आणि आधार-आधारित पडताळणीमुळे अशा प्रकरणांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.