अतिक्रमणामुळे दिल्ली वेश परिसरात वाहतुक कोंडी

वाहतूक नियोजनाचा अभाव

    दिनांक :12-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड,
traffic jam शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच दिल्ली वेश परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र ११ मार्चला पाहायला मिळाले. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 

दिल्ली वेष परिसर  
 
दिल्ली वेश परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा करताना वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांमुळे बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.दरम्यान या वाहतुक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकलेली दिसून येत आहे. आपत्कालीन सेवेसाठी असलेली रुग्णवाहिका देखील मार्ग काढू शकत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढणार असल्याची पूर्वकल्पना असूनही नगरपरिषद तसेच पोलिस प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेबाबत कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे.म्हणूनच संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि बाजारपेठेतील कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून केली जात आहे.