आमगाव,
Bag snatching gang आमगाव व ठाणा परिसरातील महामार्गावर दुचाकीवर प्रवास करणार्या महिलांच्या हातातील हँडबॅग व पर्स हिसकावून पळ काढणार्या टोळीचा आमगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी चार अल्पवयीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, मोटारसायकली व मोबाईल असा एकूण सुमारे ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील एक महिन्यापासून आमगाव व ठाणा परिसरातील महामार्गावर दुचाकीवर बसलेल्या महिलांच्या हातातील हँडबॅग हिसकावून चोरटे पळून जाण्याच्या घटना घडत होत्या. यासंदर्भात ३ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी आणि १९ फेब्रुवारी रोजी अशा एकूण चार घटनांवरून आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करून सुरू करण्यात आला. तसेच किंडगीपार, गोरठा, बोथली, ठाणा, मानेगाव व दहेगाव परिसरात महामार्गालगत नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, ८ मार्च रोजी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, संबंधित दुचाकीस्वार लांजीकडून आमगावकडे येत आहेत. त्यानुसार आमगाव येथील कामठा चौक परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित दुचाकीस्वारांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत आणखी दोन अल्पवयीन साथीदार असल्याचे समोर आले. पालकांच्या उपस्थितीत चौकशी केल्यावर त्यांनी बॅग लिफ्टिंगच्या घटना केल्याची कबुली दिली. या कारवाईत ३ फेब्रुवारीच्या घटनेतील २५ हजार रुपये, १६ फेब्रुवारीच्या घटनेतील ४ हजार रुपये तसेच १९ फेब्रुवारीच्या दोन घटनांतील सुमारे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र (अंदाजे किंमत २ लाख रुपये) व १३ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तसेच चोरीच्या पैशातून खरेदी केलेली एक मोटारसायकल, गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकली आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चारही विधीसंघर्ष बालकांना बाल न्यायालय, गोंदिया येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, उपनिरीक्षक देविदास ठमके तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचार्यांनी केली.