पाक खेळाडूला घेऊन फसली काव्य मारन; फ्रँचायझीचे एक्स अकाउंट निलंबित

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Fasli Kavya Maran by taking Pak player इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी १२ मार्च रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात सनरायझर्स लीड्स या संघाने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला विकत घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संघाच्या मालकीण काव्या मारन लिलावावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनी अबरारसाठी बोली लावत अखेरीस सुमारे २.३ कोटी रुपयांना त्याला आपल्या संघात घेतले. भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानी खेळाडूची निवड केल्याने सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा आणि टीका सुरू झाली.
 
 

Fasli Kavya Maran by taking Pak player 
या प्रकरणानंतर सनरायझर्स लीड्सच्या सामाजिक माध्यमावरील अधिकृत खात्यालाही अचानक निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे खाते पहाटेच्या सुमारास बंद करण्यात आले. मात्र खाते निलंबित करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सामान्यतः सामाजिक माध्यमाचे नियम मोडल्यास अशी कारवाई केली जाते. द हंड्रेड स्पर्धेत भारतीय मालकीच्या संघाने विकत घेतलेला अबरार अहमद हा पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. त्याच्यासाठी सुमारे २ लाख ५५ हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे २.३ कोटी रुपये मोजले गेले. मात्र या निर्णयामुळे भारतातील काही क्रिकेट चाहत्यांनी संघावर नाराजी व्यक्त केली असून सामाजिक माध्यमांवर संघ आणि त्याच्या मालकांवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
 
 
अनेकांचे मत आहे की पाकिस्तानी खेळाडूला संघात घेण्याचा निर्णय भारतीय भावनांच्या विरोधात आहे. त्यामुळे आता पुढे सनरायझर्स लीड्स हा निर्णय कायम ठेवतो की अबरार अहमदला संघातून मुक्त करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लिलावापूर्वी भारतीय मालकीच्या संघांनी या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना घेणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही ठिकाणी संभाव्य अप्रत्यक्ष बंदीचीही चर्चा होती. मात्र अबरारची निवड झाल्यानंतर संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी स्पष्ट केले की या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी ऑस्ट्रेलियातील काही खेळाडूंशी चर्चा करून अबरारबाबत माहिती घेतली होती आणि त्या आधारे त्याला संघात घेण्याचा निर्णय करण्यात आला. पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याबाबत संघात कोणतीही विशेष बैठक झाली नव्हती, असेही त्यांनी सांगितले.