अमेरिकेत भारतीय बंधूंना तब्बल ८३५ वर्षांची शिक्षा

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
पेनसिल्व्हेनिया,
Indian brothers sentenced in America पेनसिल्व्हेनियामध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या दोन भावांनी केलेल्या मोठ्या आर्थिक फसवणुकीने अमेरिका आणि भारतीय समुदायात खळबळ उडवली आहे. भास्कर सावनी आणि अरुण सावनी या बंधूंवर अनेक वर्षांपासून विविध मार्गांनी फसवणूक करून करोडो डॉलर्स मिळवल्याचा आरोप आहे. न्यायालयाने भास्कर सावनीला ४२० वर्ष तर अरुण सावनीला ४१५ वर्षांची शिक्षा सुनावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकत्रितपणे त्यांना तब्बल ८३५ वर्षांच्या कारावासाचा सामना करावा लागू शकतो. अंतिम सुनावणी ८ आणि ९ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
 
 

Indian brothers sentenced in America 
तपासात असे आढळले की, त्यांनी “सावनी ग्रुप” नावाने कंपन्यांचे विस्तृत नेटवर्क उभारले होते. या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी मेडिकेड आरोग्य विमा कार्यक्रम आणि H-1B व्हिसा प्रणाली यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. कर्मचार्‍यांना नोकरी मिळाल्यानंतर विविध शुल्क भरण्यास भाग पाडले जात असे आणि त्यांचा वेतनाचा काही भाग सावनी बंधूंना परत द्यावा लागत असे.अमेरिकेच्या न्यायालयाने दोघांनाही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. त्यात व्हिसा फसवणूक, आरोग्यसेवा फसवणूक, मनी लाँडरिंग, करचोरी अशा प्रकारचा समावेश आहे. सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, सावनी बंधूंनी अनेक वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने हा घोटाळा राबवला.
 
भास्कर सावनी हे व्यवसायाने दंतवैद्य असून त्यांनी कंपन्या आणि क्लिनिकच्या माध्यमातून मेडिकेडकडून खोट्या बिलांचा लाभ घेतला. दुसऱ्या दंतवैद्याचे नॅशनल प्रोव्हायडर आयडेंटिफायर वापरून खोट्या बिलांची नोंद केली गेली, तसेच काही वेळा प्रमाणित न नसलेल्या दंतवैद्यांकडून उपचार करूनही बिल मेडिकेडकडे सादर केले गेले.तपासात असेही समोर आले की, या फसवणुकीतून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांमधून फिरवून लपवला जात होता. कर फसवणूक, मनी लाँडरिंग आणि व्यावसायिक खर्च दुरुस्त दाखवून वैयक्तिक खर्च वाचवण्याचे प्रकारही उघड झाले आहेत. सावनी बंधू सोशल मीडियावरही सक्रिय होते. २०२३ मध्ये आरोप दाखल झाल्यानंतर त्यांनी एफबीआय संचालकांची भेट घेतल्याचा फोटो पोस्ट करून चर्चा निर्माण केली होती.