कोल्हापूर,
Kolhapur Ambabai Temple कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून मुख्य गाभाऱ्याचे संवर्धन करण्यात येणार असल्यामुळे १४ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत देवीच्या मुख्य गाभाऱ्याचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. दरम्यान, भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचे दर्शन घेता येईल. मंदिरातील सर्व दैनंदिन धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली आहे. देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन १८ मार्च २०२६ पासून पुन्हा सुरू होईल. त्यामुळे भाविकांनी या बदलाची नोंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.