तेहरान,
Mojtaba Khamenei is not safe इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूयांनी पत्रकार परिषद घेऊन कठोर भूमिका व्यक्त केली. त्यांनी सांगितले की सुन्नी आणि शिया पंथातील अतिरेकी गट जगासाठी मोठा धोका निर्माण करत आहेत आणि ही समस्या आपोआप संपेल अशी अपेक्षा करता येणार नाही. मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. लेबनॉनमधील परिस्थितीवर बोलताना त्यांनी हिजबुल्लाह या संघटनेचा उल्लेख केला. लेबनॉन सरकारला आधीच इशारा देण्यात आला असून त्यांनी या संघटनेला निःशस्त्र करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जर कारवाई झाली नाही तर इस्रायल स्वतः पावले उचलेल आणि त्यासाठी हिजबुल्लाहला मोठी किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

इराणमधील सत्तेविरोधात असलेल्या गटांना इस्रायल मदत करत आहे का, असा प्रश्न विचारल्यावर नेतान्याहू यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी मात्र असे म्हटले की इराणमधील विद्यमान सत्ताव्यवस्था बदलण्यासाठी तेथील लोकांच्या प्रयत्नांना महत्त्व आहे. इराणी जनतेला मदत मिळू शकते, असा संकेत त्यांनी दिला, पण भविष्यात नेमके काय घडेल याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. इस्रायल मध्यपूर्वेतील परिस्थितीत मोठा बदल घडवून आणेल आणि देश पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बदलाची जाणीव आता मित्रदेशांसह शेजारी देशांनाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबाबत बोलताना नेतान्याहू यांनी कठोर इशारा दिला. मोज्तबा खामेनीयांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हमी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना सुरक्षिततेची हमी दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पत्रकारांनी हिजबुल्लाहचे नेते नैम कासेम यांच्याबाबतही प्रश्न विचारला असता, दहशतवादी संघटनांच्या नेत्यांसाठी कोणताही संरक्षणाचा कवच नसल्याचे नेतान्याहू यांनी पुन्हा ठामपणे नमूद केले.