मोसीकॉलची जागा विक्रीची निविदा प्रक्रिया रद्द

-आ. संजय खोडके यांचे अभूतपूर्व यश -विधिमंडळात मांडला मुद्दा

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
अमरावती,
sanjay-khodke : शहरातील मोसीकॉल संस्थेची जागा विक्रीची निविदा रद्द करण्यात आ. संजय खोडके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. अमरावती शहराच्या मध्यस्थानी असलेली मोसिकॉल संस्थेची २५ एकर शासकीय जागा विक्री करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वापरासाठी अथवा शासकीय कारणास्तव उपयोगात आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात कुठेही जागा उपलब्ध नाही. म्हणून मॉसिकॉलची जागा कोणत्याही परिस्थितीत अमरावतीकर जनता विकू देणार नसून, तसे झाल्यास अमरावतीमध्ये नागरिकांचा असंतोष वाढेल, म्हणून मॉसिकॉलची जागा विक्रीसाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून ही जागा शासकीय कारणास्तव आरक्षित करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची लक्षवेधी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आ.संजय खोडके यांनी राज्यविधीमंडळात दाखल केली. या सूचनेवरून पणन मंत्र्यांनी लगेच ही निविदा रद्द करण्यात येत असल्याचे उत्तर दिले.
 
 
 
 
k
 
 
 
यापूर्वी दोनदा तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. मात्र आता पुन्हा एकदा जानेवारी २०२६ मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. भविष्यात अमरावती जिल्हा स्तरावरील विविध शासकीय-प्रशासकीय किंवा सार्वजनिक सुविधांसाठी या जागेचा अत्यंत प्रभावी वापर होऊ शकतो. शासकीय मालकीची जागा खाजगी व्यक्तींना देण्यापेक्षा ती भविष्यातील गरजेसाठी आरक्षित ठेवावी, अशी आग्रही मागणी आ. संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष लावून धरली. अमरावतीमधील स्थानिक जनतेकडूनही याबाबत सातत्याने मागणी होत असूनही याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक अमरावतीकर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व नाराजीची भावना उमटू लागली असल्याचेही संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केले व जनहिताचा विचार करून मोसिकॉलच्या जागेबाबतची सध्याची नवीन निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली.
 
 
यावर उत्तर देतांना राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत लोकप्रतिनिधीने दिलेले निवेदन व अमरावतीमधील नागरिकांच्या जनहिताची भावना लक्षात घेता मोसिकॉलच्या अमरावती जमिनी विक्रीकरिता जानेवारी २०२६ मध्ये राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, असे स्पष्ट केले.