ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी शिवणफळ-ताडगाव जंगल जोडा

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
समुद्रपूर
Tadoba Tiger Reserve शिवणफळ—ताडगाव परिसरातील जंगल क्षेत्र ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. या संदर्भात जंगलालगतच्या २२ गावांचा विचार करून तयार करण्यात आलेला सविस्तर प्रस्ताव वनविभागाकडे सादर करण्यात आला असून, यामुळे परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मोठी मदत होईल, असे मत व्यत करण्यात आले.
 

Tadoba Tiger Reserve 
शिवणफळ, ताडगाव आणि परिसरातील जंगलपट्टा जैवविविधतेने समृद्ध आहे. या जंगलात सध्या पाच पट्टेदार वाघ, चार ते पाच बिबटे, अस्वल, नीलगाय, रानडुक्कर तसेच हरणांचे कळप आढळतात. पूर्वी हे जंगल ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य अधिवासाशी जोडलेले होते. जुन्या वन नकाशांमध्ये आणि वनविभागाच्या अहवालांमध्ये या भागाचा उल्लेख ताडोबाशी संलग्न जंगल म्हणून आढळतो. मात्र, कालांतराने मानवी वस्ती वाढ, शेतीचा विस्तार आणि विविध विकासकामांमुळे हा जैविक दुवा तुटला आहे.
या तुटलेल्या नैसर्गिक मार्गामुळे वन्यजीवांच्या मुत संचारावर मर्यादा आल्या असून मानव—वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः वाघ, बिबटे आणि अस्वलांचा गावालगत वावर वाढल्याने पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवरील हल्ले तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे या जंगलाला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी पुन्हा जोडणे अत्यावश्यक असल्याचे अशोक शिंदे यांनी नमूद केले आहे.
 
दरम्यान, अशोक शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची त्यांच्या शासकीय कार्यालयात भेट घेऊन परिसरातील वाढत्या वन्यजीव संघर्षाची माहिती दिली.