मुलानेच केली वडीलाची हत्या

गोपाल नगर येथील घटना

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
अमरावती, 
the-son-killed-his-father : मुलाने ५५ वर्षीय वडीलांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. वडीलांनी नकार दिला. या कारणावरुन चिडलेल्या ३० वर्षीय मुलाने वडीलांवर काठीने डोक्यात प्रहार केला तसेच हातावर विळीने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय वडीलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी गोपालनगर परिसरातील मच्छगंधा कॉलनीत समोर आली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे.
 
 
h
 
यशवंत ऊर्फ राहूल मनोहर बोरकर (३०) असे अटक मारेकरी मुलाचे तर मनोहर मधुकर बोरकर (५५, दोघेही रा. मच्छगंधा कॉलनी, गोपालनगर, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. राहूल, मनोहरराव व त्यांचे वृध्द आई, वडील असे राहतात. गुरूवारी मध्यरात्री दिड ते दोन वाजताच्या सुमारास राहूल व मनोहर या पिता पूत्रामध्ये वाद झाला. यावेळी राहूल त्याच्या वडीलांना दारु पिण्यासाठी शंभर रुपये मागत होता. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्या कारणावरुन राहूल प्रचंड चिडला व त्याने घरातच काठीने मनोहर यांच्या डोक्यावर प्रहार केला तसेच विळीने (पावशी) त्यांच्या हात व पायावर एक ते दोन वार केले.
 
 
यामध्ये गंभीर जखमी झालेले मनोहर बोरकर मध्यरात्री तीन वाजतापासून पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत घरातच पडून होते. दरम्यान मनोहरराव यांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी सकाळी त्याच्या वृध्द आई - वडीलांना लक्षात आले. त्यानंतर ही माहीती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी ठाणेदार पुनित कुलट व राजापेठचे पोलिस पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी माहीती घेतली असता राहूल बोरकरनेच त्याच्या वडीलांना केलेल्या मारहाणीत खून झाल्याचे समोर आले. मात्र तोपर्यंत राहूल पसार झाला होता. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल मनिष करपे व त्यांच्या पथकाने राहूल बोरकरला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.