चांदूर रेल्वे
theft-at-sant-bendoji-maharaj-sansthan : संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराज संस्थान येथे तब्बल १५०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांची धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याची किंमत अंदाजे ३ लाख रुपये इतकी असून, ही घटना ११ मार्च रोजी रात्री ९.३० ते १२ मार्च रोजी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

माहितीनुसार, फिर्यादी नंदकिशोर काकडे हे बेंडोजी महाराज संस्थानात व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून देवस्थानातील चांदीचे दागिने लंपास केले. यामध्ये गळ्यातील चांदीचा हार (सुमारे ७५० ग्रॅम), चांदीचा गोप (१५० ग्रॅम), मुकुटावरील चांदीची छत्री (२०० ग्रॅम), चांदीचा टोप (१६० ग्रॅम) आणि चांदीच्या दोन जोड पादुका (२४० ग्रॅम) अशा एकूण १५०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
तळेगाव दशासर पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ३०५ (डी), ३३१ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरी करणारा संशयित आरोपी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून त्या आधारे आरोपीचा शोध पोलिस घेत आहे. मात्र एवढ्या मोठ्या देवस्थानात झालेल्या धाडसी चोरीमुळे पोलिसांसमोर आरोपीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.