कारंजा लाड,
illegal gelatin explosives, तालुक्यात अवैद्य जिलेटीन स्फोटकांचा वापर करून अवैधरित्या ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिलेटिन स्फोटकांचा वापर करून विहिरीतील दगड फोडण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशीर प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी तर नियम धाब्यावर बसवून जिलेटिन स्फोटकांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येत आहे. यासाठी जिलेटींचा साठा करून ठेवल्या जात असल्याची माहिती आहे. स्फोटकांचा वापर हा अत्यंत संवेदनशील विषय असतानाही त्यावर नियंत्रण नसल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्फोटांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होत असून, कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्या या गंभीर प्रकारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची चर्चा असून, त्यामुळेच या प्रकाराला जणू मोकळे रान मिळाले असल्याचा आरोप करीत तलाठी आणि महसूल मंडळ अधिकार्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. अवैध ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरे, शेती आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असताना प्रशासनाने अद्याप कठोर पावले उचललेली नाहीत, ही बाब चिंतेची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कारवाईची गरज
महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्या विना परवाना जिलेटीन स्फोटकांचा साठा वाहतूक आणि वापर या गंभीर प्रकारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध ब्लास्टिंग करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.