आमगाव,
Ashish Mahure येथील आशिष राजकुमार माहूरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता (राजपत्रित गट-अ) पदावर निवड मिळवली आहे. गोंदिया जिल्ह्यातून प्रथम, नागपूर विभागातून तिसरा आणि संपूर्ण राज्यात २९ वा क्रमांक मिळवत त्यांनी हे यश मिळवले आहे. सध्या त्यांची पहिली नेमणूक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, चंद्रपूर येथे उपअभियंता म्हणून करण्यात आली आहे.
आशिष माहूरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आमगाव येथील आदर्श विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी संपादन केली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असतानाही प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी जिद्दीने जपले. स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी प्रामुख्याने घरी राहूनच केली. त्यांच्या मेहनतीमुळे गेल्या दोन वर्षांत एकूण सात वेगवेगळ्या पदांवर त्यांची निवड झाली आहे. सद्या ते सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर येथे २०२४ पासून कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेतील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना आशिष म्हणाले की, योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि अभ्यासातील सातत्य यामध्येच यशाचे खरे गमक आहे. त्यांच्या या यशामागे आई-वडील, भाऊ तसेच मित्रपरिवार यांचे मोठे योगदान असून कठीण परिस्थितीत त्यांनी कायम आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले, असे त्यांनी नमूद केले. आशिष माहूरे यांच्या या यशामुळे आमगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.