वेध
dr ashok kale सकाळी घरातून निघालेली व्यक्ती सायंकाळी सुखरूप परत येईल का, याची हमी कुणीही देऊ शकत नाही. एवढी वाहतूक व्यवस्था हाताबाहेर गेली आहे. या स्थितीत समजा तुम्ही अपघातग्रस्त झाला अन् तुम्हाला रक्ताची गरज भासल्यास करणार काय? त्यावेळी डॉक्टरांना प्रथमत: तुमचा रक्तगट नेमका कोणता हे तपासून घ्यावा लागेल. यात 40 मिनिटे वाया जातील. दरम्यान, रक्तगट कळल्यावर त्यानुसार रक्त मिळविण्यासाठी वेळ वाया जाईल. तिकडे सुवर्णकाळ संपल्याने तोवर तुम्ही यमाघरी जाल. हीच भीती लक्षात घेता शरीरावर रक्तगट गोंदवा अन् स्वत:सह लोकांना वाचवा अशा स्वरूपाची अभिनव संकल्पना पुण्यातील भारतीय स्वास्थ्य चिंतनचे राष्ट्रीय संयोजक डॉ. अशोक काळे यांनी मांडली आहे. त्यांनी याकरिता गेल्या 30 वर्षांपासून एक लढाच सुरू केला आहे. त्यात यश येणे पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीसाठी लाभदायक ठरणार आहे. माणूस कुठलाही असो, त्याचा रक्तगट आयुष्यभर कायमच असतो. तोच धागा पकडून पहिल्या आणि दुसèया महायुद्धात सहभागी सैनिकांच्या शरीरावर त्यांचा रक्तगट गोंदविण्यात आला होता.
युद्ध असल्याने शेकडो सैनिक जखमी होणार होते. त्यानंतर जखमींवर उपचार करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा जखमींना तातडीने सर्व उपचार मिळावेत म्हणून रक्तगट गोंदविण्याची योजना फलदायी ठरली. जखमी सैनिकांना यामुळे नवजीवन प्राप्त झाले. मग तीच संकल्पना सामान्य माणसाकरिताही लागू का केली जात नाही, असाच विचार करून डॉ. अशोक काळे या लढाईचे नेतृत्व करीत आहेत. रक्तविषयातील तज्ज्ञ डॉ. अशोक काळे समाजभान जपणारे व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. पुणे मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक अपघातग्रस्तांना तडफडून मरताना पाहिले. तेव्हाच त्यांनी यावर उपाय करण्याचा संकल्प सोडत रक्तगट गोंदवा अन् आयुष्य वाचवा याकरिता स्वत:ला झोकून दिले आहे.
वस्तुत: अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी एक तासाचा सुवर्णकाळ मानला जातो. तो सुवर्णकाळ रक्तगट तपासणीतच वाया गेल्यास अपघातग्रस्त तडफडून यमाघरी जातो. सर्व यंत्रणा तेव्हा हतबलतेने फक्त पाहात असते. समजा अपघातग्रस्ताच्या शरीरावर टॅटूऐवजी रक्तगट गोंदविलेला दिसला असता तर नक्कीच डॉक्टरांनी त्याच गटाचे रक्त त्याला देत नवजीवन मिळवून दिले असते. हीच संकल्पना लोकांमध्ये रुजावी, प्रत्येक अपघातग्रस्त बरा व्हावा अशी उदात्त भावना मनात ठेवत डॉ. अशोक काळे यांचा पुढाकार नक्कीच लोकहिताचा आहे. वर्तमानात युवक आणि युवती नको तिथे टॅटू गोंदवून घेतात. शरीर त्यांचे असल्याने ते त्यावर काहीही करू शकतात. यासंदर्भात कुणाचेही दुमत नाही. पण त्यांनी त्याशिवाय स्वत:चा रक्तगट गोंदविला तर नक्कीच त्याचा लाभ सर्वांनाच होईल. याकरिता संपूर्ण देशभरात एकवाक्यता ठरवायला हवी. त्यानुसार उजव्या कानाच्या मागे रक्तगट गोंदविण्याची पद्धत सर्वत्र लागू व्हायला हवी. उजव्या किंवा डाव्या कानामागे रक्तगट इंग्रजीत गोंदविल्याने तो कुणाच्याही सौंदर्यात कुरूपता आणणार नाही. लहानपणी नाही का आपली आई आपल्या कानामागे टिका लावून दुर्जनशक्तींपासून वाचविण्यासाठी प्रार्थना करायची. अगदी तसाच इलाज हा ठरणार आहे.
भारतात 2025 मध्ये 4 लाख 80 हजार अपघात झाले. याचा अर्थ दररोज 1315 अपघात घडले. महाराष्ट्रात 2025 मध्ये 40 हजारपेक्षा जास्त अपघात झाले. त्यात 15550 लोकांचा हकनाक मृत्यू झाला. एवढे अपघात पाहता भविष्यात आपलाही अपघात कुठेही होऊ शकतो, हे सर्वांनीच लक्षात ठेवायला हवे. रस्त्यावर धावणाèया यमांपासून कुणीही वाचणार नाही, एवढी दाहक परिस्थिती कायमच राहणार आहे. मग आपल्यावर तशी वेळ आल्यास करणार काय, याचा विचार करून स्वत:ला वाचविण्यासाठी तरी आज रक्तगट गोंदविणे फलदायी ठरू शकते. अपघातमुक्त भारत ही संकल्पना मांडणे सोपे आहे. पण ती संकल्पना खèया अर्थाने पूर्णत्वास जाणे कठीण आहे. कारण रस्त्यावर वाहन चालविणारा अनेक चुका वारंवार करीत आहे. मोबाईलवर बोलू नका, असे सांगितल्यावरही चालक त्याचा सर्रास वापर करतात.dr ashok kale शिवाय दोषी चालकांना फाशी होत नसल्याने भविष्यात अपघातांची संख्या वाढतच जाणार आहे. ते कटू वास्तव पाहता त्या गोंधळात स्वत:ला वाचवून आपले कुटुंबीय सुरक्षित ठेवायचे झाल्यास आजच उजव्या कानामागे आपला रक्तगट गोंदवून घ्या. हातावर, पायावर आणि नको त्या जागेवर भलते सलते चित्र टॅटूच्या रूपात गोंदविण्यापेक्षा रक्तगट इंग्रजीत टाकणे नक्कीच फलदायी ठरेल. शेवटी, आपला जीव ज्याला प्यारा असेल त्याने यावर अंमल करावा, हीच माफक अपेक्षा.
- अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859