ढाका
Controversy in Bangladesh-Pakistan match ढाका येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेश-पाकिस्तान एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना वादग्रस्त ठरला. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज सलमान अली आघा धावबाद झाल्यानंतर मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराजने केलेल्या धावबादच्या पद्धतीवरून दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. सामन्यानंतर सलमान अली आघाने या संपूर्ण प्रसंगावर आपली प्रतिक्रिया दिली आणि क्रीडाभावनेला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.सलमान अली आघा यांनी सांगितले की, हा प्रकार क्षणाच्या तणावात घडला. प्रत्येकाने हा प्रसंग पाहिला आहे. नियमांच्या चौकटीत जे झाले ते योग्यच होते, याबाबत शंका नाही; मात्र त्याच परिस्थितीत आपण असतो तर वेगळा निर्णय घेतला असता, असे त्यांचे मत आहे. खेळात नियम महत्त्वाचे असले तरी क्रीडाभावनेला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हा प्रसंग पाकिस्तानच्या डावातील एकोणचाळीसाव्या षटकात घडला. त्या वेळी फलंदाज मोहम्मद रिझवानने समोर खेळलेला चेंडू थांबवण्यासाठी मेहदी हसन मिराज पुढे सरसावला आणि त्याच्या बुटाला चेंडू लागून तो थांबला. दरम्यान, नॉन-स्ट्रायकर टोकावर असलेला सलमान अली आघा क्रीजमध्ये परतण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये हलकी टक्कर झाली. चेंडू आघाच्या पायाजवळ थांबला होता आणि तो त्यावेळी क्रीजच्या बाहेर होता. चेंडू निष्प्रभ झाला आहे, असा समज करून आघा तो उचलून मिराजकडे परत देण्यासाठी खाली वाकला. मात्र मिराजने तत्परता दाखवत चेंडू उचलला आणि तो थेट स्टंपवर फेकत धावबादसाठी अपील केले. तिसऱ्या पंचांनी पुनरावलोकन पाहिल्यानंतर सलमान अली आघाला बाद घोषित केले. हा निर्णय जाहीर होताच आघा संतापला आणि त्याने मैदानावरच मेहदी हसन मिराजशी वाद घालायला सुरुवात केली. या घटनेमुळे सामना संपल्यानंतरही या धावबादावर मोठी चर्चा रंगली.