गोंदिया,
gulla squad जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरात ११ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दाखल होत पहाटे परत गेलेल्या रानटी हत्तींनी शुक्रवारी रात्री पुन्हा जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात एंट्री करत सुमारे ६० एकरातील मक्का पिकाला तुडवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाकडून या हत्तींवर ड्रोन कॅमेर्यांनी पाळत ठेवण्यात येत असून या हत्तींना नियंत्रित करण्यासाठी कोलकाता येथून ‘गुल्ला’ पथकाला पाचरण करण्यात आले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रात बुधवारी रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलातून २० ते २२ रानटी हत्तींचा कळप दाखल झाला होता. कळपाने मक्क्याच्या शेतातून वाट काढल्यामुळे काही शेतकर्यांच्या शेतातील मक्का पिकाचे नुकसान झाले होते.

तर गुरुवारी हा कळप गडचिरोलीच्या दिशने परतल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, दुसर्याच दिवशी १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा या हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात प्रवेश केला असून जवळपास ६० एकरातील मका पिकाची नासधूस केली आहे. त्यामुळे परिसरात या हत्तींची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून ड्रोन कॅमेर्यांने पाळत ठेवली जात असताना जंगल परिसरात वन विभागाच्या पथकाकडून गस्त वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्तींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोलकाताच्या ‘गुल्ला’ पथकाला पाचारण करण्यात आले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मोहफुलांचे आकर्षण...
गोठणगाव जंगल आणि शेतशिवारात मोहफुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असून सद्या मोहफुलांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातच हत्तींना मोहफुलांची विशेष आवड असल्याने ते या भागाकडे आकर्षित होत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
काय आहे ‘गुल्ला’पथक...
विशेष प्रशिक्षित ‘गुल्ला’ पथक पारंपारिक पद्धती, अनुभव आणि स्थानिक समजुतींचा वापर करून हत्तींना कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे जंगलात परत पाठवण्याचे काम करते. मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी हे पथक महत्त्वाची भूमिका बजावत असून पथकातील सदस्यांना पारंपारिक तंत्र, जंगलातील मार्गांचा अभ्यास आणि हत्तींच्या वर्तनाचा अभ्यास याचे विशेष प्रशिक्षण दिलेले असते.
वडेगाव (बंध्या) आणि इतर काही भागात हत्तींचे पगमार्क आढळले आहेत. काही शेतांतील पिकांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.gulla squad दरम्यान, वन विभाग, गुल्ला पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हत्तींना पुन्हा जंगलाच्या दिशेने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- मिलिंद पवार,
वनपरिक्षेत्राधिकारी, गोठणगाव