शेतात बैलं आहेत पण सालगडीच नाय!

शोधकार्य जोरात सुरू

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
विलास नवघरे
समुद्रपूर,
oxen in the farms शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा सण व मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा काही दिवसांवर आला आहे. गुढीपाडव्यापासून शेतातील विश्वासाची कामं करण्यासाठी सालगडी ठेवला जातो. हाताला काम नाही अशी बोंब असली तरी शेतात काम करायला सालगडी मिळणे कठीण झाले आहे. आजच्या परिस्थितीत शेतात बैलं आहेत. पण, त्यांना सांभाळणारे सालदार मिळणे दुरापस्त झाले. त्यामुळे आहे त्यालाच वाढीव साल देण्याची तयारी शेतकर्‍याने केली आणि किंवा नवीनच्या शोधात तो सध्या उन्हातान्हात भटकतो आहे, यंदा अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातून सोयाबीन गेले, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक घडी कोलमडून गेली आहे. तरी देखील सालगडी लाखमोलाचा झाला असून गावागावात शेतकरी शोध घेत असले तरी कुणीही सालगडी म्हणून राहण्यात तयार नसल्याचे चित्र आहे.
 

shetkari
 
अनेक वर्षांपासून शेतीकामासाठी सालगडी महत्त्वाचा भाग झाला आहे. सालगड्याला वर्षभरासाठी रकम व धान्याच्या स्वरूपात महिन्याला ६ कुडव गहू मोबदला दिला जातो. जसजशी वर्षे बदलत चालली तसतसे पिकांचे वाटोळे होत चालले आहे. शेतकरी जरी तांत्रिक शेतीकडे वळला असला तरी देखील बैलासोबत कसण्यासाठी सालगड्याचे महत्त्व आजही तितकेच आहे. ग्रामीण भागातील मुलं शेतीची कामे करायला तयार नाहीत. त्यांची धाव शहरातील खाजगी कंपनीत १०-१२ हजार रुपये महिन्याच्या नोकरीकडे आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस शेतकर्‍यांना शेतात सालगडी व मजूर मिळणे कठीण झाले आहे. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याला सण साजरा होणार आहे. मात्र अनेक शेतकर्‍यांना अजून नवीन सालगडी मिळाला नाही. अलीकडच्या काळात मनाप्रमाणे पैसे देऊनही सालगडी मिळने कठीण झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागणी प्रमाणे सालाचे पैसे मोजूनही सालगड्याची मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
 
रुढी परंपरेनुसार गुढीपाडवा पृष्ठभूमीवर नवीन सालगडी शोधावा लागत आहे. गेल्यावर्षी १ लाख ७० हजार रुपये साल व ६ कुडव धान्य होते यंदा २ लाख व ६ कुडव धान्य इतका मोबदला देऊनही सालगडी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे येत्या काळात शेती कशी करायची हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे मोहगाव येथील शेतकरी आशिष नाईक यांनी दिली. तर यंदा सालगड्याचे दर गगनाला भिडले आहे.oxen in the farms शेतात लाख रुपयांच्या बैलजोडी सोबत कसण्यासाठी सालगड्याची मदत आवश्यक आहे. आपल्याकडे टॅटर असले तरी याने फक्त शेताची नांगरणी व शेतीपुर्व मशागत करू शकतो. मात्र कपाशी लागवड, पेरणी डवरणी खुरपणी यासाठी बैलांसोबत माणसाची गरज आहे. कापूस कवडमोल दराने विक्री करावा लागतो आहे.आता सालगड्याचे साल गगनाला भिडले असल्याचे गिरड येथील युवा शेतकरी बलवंत गाठे यांनी सांगितले.
 
 
दोन लाख साल
शेतमाल कवडीमोल भावाने विकल्या जात आहे. मात्र, सालगड्याचे साल वाढत चालले असून यंदा दीड लाखापासून तर दोन लाखाच्यावर साल गेले आहे.