अर्जुनी मोरगाव,
accident : वळण रस्त्यावर अनियंत्रित झालेला ट्रक धावत्या दुचाकीवर उलटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील गौरनगर येथे अर्जुनी मोरगाव-वडसा राष्ट्रीय राज्य महामार्गावर घडली. अशोक मोरेश्वर काळबांधे (४८) व रमेश बिसन साऊसकर (४९) दोघेही रा. इंदोरा, ता. लाखांदूर जि.भंडारा असे मृतांचे नाव आहे.

मृत अशोक व रमेश हे दोघेही दुचाकी क्रमांक एमएच ३६ एन ९६४५ ने अर्जुनीकडून वडसाच्या दिशेने जात असताना गौरनगर परिसरातील नागमोडी वळणावर मागून येत असलेल्या १८ चाकी ट्रक क्रमांक सीजी ०४ एनबी १०४८ च्या चालकाचे स्टेअरींगवरून नियंत्रण सुटले. यावेळी ट्रक अनियंत्रित होऊन अचानक उलटला. त्याचवेळी शेजारून दुचाकीने जात असलेले दोघेही ट्रकच्या खाली दाबल्या गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या विरोधात अर्जुनी मोरगाव पोलिसांनी भांदवी २८१, १०६,१८४ मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन शेंडे करीत आहेत.
आनंदाचे क्षण दुःखात बदलले..
मिळालेल्या माहितीनुसार अशोक घाटबांधे यांच्या येथे त्यांच्या मुलीचे लग्न जुळले असून लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते मित्र रमेश साऊसकर यांच्यासह दुचाकीने घरून निघाले होते. लग्नाच्या पत्रिका वाटप करताना वडसा मार्गे स्वगावी जाण्याच्या त्यांचा बेत होता. त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. काही दिवसांवर लग्न सोहळा असल्याने घरी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना या घटनेमुळे आनंदाचे क्षण दुःखात बदलले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
...