कोट्यवधींचे बसस्थानक पण नियोजन शुन्य; प्रवाशांची दुर्दशा

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
सेलू,
Bus stand कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सेलू येथील बसस्थानक आता प्रवाशांच्या गैरसोयींचे केंद्र बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा अभाव, अस्वच्छ परिसर, दुर्दशाग्रस्त स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था यामुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
 
 
Bus stand
 
सेलू बसस्थानक परिसरात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र एवढ्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय असून परिसरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. Bus stand त्यामुळे विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याने प्रवाशांची आणखी गैरसोय होत आहे. याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बसस्थानकात न येता बाहेरच थांबत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. काहींना यशवंत विद्यालय चौकापर्यंत जाण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात तर अनेक गोरगरिबांना पायपीट करावी लागते. व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 
 
या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य धीरज पवनाकर यांनी बसस्थानक प्रमुखांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बसस्थानकात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, परिसरात नियमित स्वच्छता ठेवावी, स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करावी, तसेच प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. Bus stand तसेच सर्व डेपोच्या बसेस बसस्थानकातच थांबवण्याची सती करावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी नगरसेवक दिनेश माहुरे, समाजसेवक मनोज केळझरकर तसेच अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
 
 
आठ दिवसांचा अल्टिमेटम
प्रशासनाने आठ दिवसांच्या आत या सर्व समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. Bus stand कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या बसस्थानकातच प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यत होत आहे.