नागपूर,
dr-girish-gandhi : सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमाेजणी अखेर आज पार पडली. अध्यक्षपदाची माळ डाॅ. गिरीश गांधी यांच्या गळ्यात पडली आहे. डॉ. गांधी यांनी मावळते अध्यक्ष प्रदीप दाते यांचा 1 हजार 474 मतांनी पराभव केला. रविवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.

विदर्भ साहित्य संघाची 2026 ते 2031 या कार्यकाळाकरिता निवडणूक घेण्यात आली हाेती. मतमाेजणीला रविवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. अवैध मते बाजूला काढून वैध मतांची माेजणी करण्यात आली. अध्यक्षपद आणि कार्यकारिणीसाठी दाेन स्वतंत्र रंगांच्या मतपत्रिका तयार करण्यात आल्या हाेत्या. या दाेन्ही मतमाेजणी प्रक्रिया एकाच वेळी सुरु करण्यात आल्या. रात्री 8 वाजताच्या सुमारास अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची मतमाेजणी पूर्ण झाली. यात डॉ. गिरीश गांधी यांनी सर्वाधिक 2 हजार 661 मते मिळविली. त्यांच्या पाठाेपाठ विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांना 1 हजार 187, डाॅ. श्रीपाद भालचंद्र जाेशी यांना 701, डाॅ. रवींद्र शाेभणे यांना 205 तर डाॅ. रंजन दारव्हेकर यांना 114 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. माेहन पारखी यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 868 मते वैध ठरली तर 63 मते अवैध असल्याचे निदर्शनास आले.
कार्यकारिणीचा निकाल आज
कार्यकारिणीतील 22 पदांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत. शेवटी हाती आलेल्या वृत्तानुसार केवळ सहा फेऱ्या आज पार पडल्या हाेत्या. अजून 18 फेऱ्या बाकी आहेत. जवळपास 80 विद्यार्थी व प्राध्यापक या मतमाेजणी प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मतमाेजणी अखंड सुरू राहणार असून त्याला साेमवारी रात्रीपर्यंतचा अवधी लागणार असल्याचे पारखी यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकारिणीच्या निकालाची उत्सुकता अद्यापही कायम आहे.
विजयाचा जल्लाेष
विजयी हाेताच डाॅ. गिरीश गांधी विदर्भ साहित्य संघात दाखल झाले. येथे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. सर्वांच्या विजयाचा स्वीकार करून ते मावळते अध्यक्ष प्रदीप दाते यांना भेटले. दाते यांनीही त्यांचे अभिनंदन केले. डाॅ. गांधी यांच्या पॅनेलमधील उमेदवारांसह समर्थकांनी यावेळी विजयाचा जल्लाेष केला.
20 वर्षांनी वि. सा. संघ गजबजला
तब्बल 20 वर्षांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमाेजणी आज सकाळी 10 च्या सुमारास अमेय दालनात सुरुवात झाली. सकाळपासूनच निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांसह साहित्य, संस्कृती, नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवरांची येथे लगबग दिसून आली. अनेक वर्षांनी वि. सा संघ गजबजल्याचे चित्र दिसून आले.
अध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते
गिरीश गांधी- 2661
प्रदीप दाते- 1187
डाॅ. श्रीपाद भालचंद्र जाेशी- 701
डाॅ. रवींद्र शाेभणे- 205
डाॅ. रंजन दारव्हेकर- 114
वैध मते- 4868
अवैध मते- 63
हा विजय प्राचार्य शेवाळकरांच्या स्मृतींना अर्पण - डाॅ. गांधी
अतिशय आनंदाने आणि कृतज्ञतेने हा विजय मी स्वीकृत करताे आणि ताे प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतींना, कर्तृत्वाला मनाेभावे अर्पण करताे. वि. सा. संघाच्या परंपरेतील चांगल्या गाेष्टी मनाेभावे कायम ठेवण्यात येतील. परंतु काही गाेष्टी बदलविण्याची वेळ आल्यास त्यात बदल करण्याचा व सर्व चांगल्या गाेष्टींचा स्वीकार करून राहिलेल्या त्रुटी दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. येथे आजवर अध्यक्षपदी विराजमान प्रभृतींची आणि माझी तुलनात हाेऊ शकत नाही. मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत आणि त्या मर्यादेत राहूनच पुढे वि. सा. संघासाठी कार्य करणार आहे.
- डाॅ. गिरीश गांधी
नवनिर्वाचित अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ.