शेतकर्‍यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा : डॉ. भोयर

*महाविस्तार एआय अ‍ॅपच्या नोंदणी मोहिमेत वर्धा जिल्हा राज्यात प्रथम

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : शेतकर्‍यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ व आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेती अधिक उत्पादनक्षम कशी करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी शेतकर्‍यांनी एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
 
 
 
jk
 
 
 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सेलसुरा येथे अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कृषी व स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसाीं पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, उपसंचालक राणी गायकवाड, मिलिंद भेंडे, निलेश पोहेकर आदी उपस्थित होते.
 
 
कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम नियमितपणे आयोजित करता यावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र शेतकरी सभागृह उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी, टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने एक स्वतंत्र मंच स्थापन करून शेतकर्‍यांना थेट बाजारपेठेची माहिती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री भोयर यांनी दिल्या.
 
 
महाराष्ट्र शासनाने सन २०२६ हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील प्रगतिशील महिला शेतकरी व कृषी सखी यांच्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे अभ्यास दौरा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्यास त्याचा अधिक फायदा होईल. विदर्भ हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जात असल्याने कापूस उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकर्‍यांना अधिक मार्गदर्शन मिळावे, यासाठी लवकरच सेवाग्राम येथे कॉटन परिषद आयोजित करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या कृषी अ‍ॅपच्या नोंदणी मोहिमेत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरी व कृषी विभागाचे कौतुक त्यांनी केले. यावेळी डॉ. धनराज उंदीरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनीही मार्गदर्शन केले.