मुंबई
Maharashtra प्रधानमंत्री सुर्यघर मोफज वीज योजनेमध्ये महाराष्ट्रात मागील एक वर्षात १.०८ लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले असून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावल्याची माहिती वीज कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.
देशात महिना तीनशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य व्हावे व अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना हाती घेतली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या थेट उपयोगाच्या या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना राज्य शासनाने सर्व जिल्हयातील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात या योजनेला मोठा प्रतिसादही मिळू लागला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांतील योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत किती ग्राहकांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले याची माहिती घेतली. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त १.०८ लाख ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात ९५ हजार, गुजरात ९४ हजार, राजस्थान ३९ हजार तर केरळ राज्यात ३६ हजार ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे. देशामध्ये या कालावधीत एकूण ५ लाख ५७ हजार २२४ घरगुती ग्राहकांकडे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. त्यापैकी १९ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत. त्याबद्दल केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने अभिनंदन केले आहे.
किती किलोवॅटसाठी किती सबसिडी
Maharashtraप्रस्तुत योजनेत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट दिले जाते. ऊर्वरित रक्कम लाभार्थी वीजग्राहकाने भरायची असते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्माण होते. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यामुळे त्याचे बिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज विकून त्याला उत्पन्नही मिळते. एकदा सौरऊर्जा प्रकल्प बसविला की त्यातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याचे वीज कंपनीच्या सुत्रांनी सांगितले.