तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
solar-powered सामाजिक वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘सोलर पॉवर्ड स्मार्ट कम्युनिटी लायब्ररी कॅबिनेट विथ इंटिग्रेटेड इन्फर्मेशन’ या अभिनव संकल्पनेला युनायटेड किंगडम (यूके) इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसकडून पेटंट मंजूर झाले आहे.
या संशोधनाचे प्रमुख संशोधक यवतमाळचे अनिकेत रवींद्र इंगोले असून त्यांच्यासोबत रेवती खोखले, स्विटी कुमारी आणि जमना प्रसाद यांनीही या प्रकल्पात योगदान दिले आहे. या डिझाईनला 9 मार्च 2026 रोजी नोंदणी मिळाली असून 12 मार्च 2026 रोजी अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.सौरऊर्जेवर चालणारे हे स्मार्ट कम्युनिटी लायब्ररी कॅबिनेट सार्वजनिक ठिकाणी बसवता येईल. या प्रणालीद्वारे नागरिकांना मुक्तपणे पुस्तके घेणे, परत करणे व माहिती मिळवणे शक्य होणार आहे. यात इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन सिस्टम असल्यामुळे पुस्तकांची माहिती, व्यवस्थापन आणि वाचनसेवा अधिक सुलभ होईल.
ही संकल्पना समाजात वाचनाची सवय वाढवणे, समुदायामध्ये ज्ञानवाटप करणे आणि सार्वजनिक ठिकाणी लघु ग्रंथालय उभारणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील लोकांना सहजपणे वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.युनायटेड किंगडमकडून मिळालेली ही मान्यता भारतीय संशोधकांसाठी अभिमानाची बाब असून कम्युनिटी लायब्ररी चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.