गोंदिया,
surekha-azad-meshram : जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण आणि राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत १४ मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाणा येथे विशेष समुपदेशन व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उत्कृष्ट समुपदेशन सेवा दिल्याबद्दल मनोवैज्ञानिक सुरेखाआझाद मेश्राम यांचा शिक्षण समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोवैज्ञानिक सुरेखाआझाद मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणार्या घातक परिणामांची सविस्तर माहिती दिली. व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घेऊन त्यांना प्रमाणपत्रे आणि माहितीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी मेश्राम यांच्या प्रभावी मार्गदर्शनाची दखल घेत शिक्षण समितीचे अध्यक्ष केवट यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दंत सहाय्यक यश जायस्वाल आणि विवेकानंद कोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.