युद्धाची झळ ; पूर्व विदर्भातील राईस मील उद्योग संकटात !

- कोट्यावधीचा तांदूळ अडकला ः निर्यात ठप्प

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
गोंदिया, 
rice-flour-industry : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता पूर्व विदर्भातील राईस मील उद्योगावरही होऊ लागले आहे. याची सर्वाधीक झळ गोंदिया जिल्ह्याला बसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात गिरण्या असून युद्धामुळे मागील पंधरा दिवसांपासून आखाती देशांकडे जाणारी तांदळाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यातच कोट्यावधी रुपयांचा तांदुळ सद्या जेएनपीटीमध्ये अडकल्याचे राईस मिलर्सकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महत्त्वाचा मानला जाणारा येथील राईस मिल उद्योग गंभीर संकटात सापडला आहे.
 

 jhik
 
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. तर सुमारे १ हजार ११० राईस मिल या भागात असून यापैकी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक भात गिरण्या असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, राईस सिटी म्हणून गोंदिया जिल्ह्याची वेगळी ओळख असून या भागात उत्पादित होणार्‍या उष्णा तांदळाची देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. विशेषतः एकट्या गोंदिया जिल्ह्यातून इराण, कतार, सौदी अरेबिया, इस्त्रायल आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये दरवर्षी सुमारे ४ लाख मैट्रीक टन तांदळाची निर्यात केली जाते. ज्याचे बाजार मुल्य १२०० कोटी रुपयांच्या वर आहे. मात्र, सद्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे या देशांकडे जाणारी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. त्यातच आधीच पाठविण्यात आलेले शेकडो कंटेनरही मुंबईतील जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहे. परिणामी व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर निर्यात थांबल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत तांदळाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे तांदळाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. खरेदीदार नसल्याने व्यापार्‍यांपुढे माल साठवून ठेवण्याची वेळ आली आहे.
 
 
अनेकांच्या रोजगारावर परिणाम...
 
 
उत्पादन कमी झाल्यामुळे काही मिलर्सनी कामकाज मर्यादित केले असून काही ठिकाणी कामगारांना तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे राईस मिलमध्ये काम करणार्‍या अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या रोजगारावरही गंभीर परिणाम झाला आहे.
 
 
इराण-अमेरिका युद्धामुळे आमच्या उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर तांदूळ आखाती देशांमध्ये पाठवला जात होता, मात्र, सद्या निर्यात पूर्णपणे थांबली आहे. आधी पाठविलेल्या तांदळाचे पैसेही अडकले आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्जाचे व्याज भरणे कठीण होत आहे. त्यातच शासनाकडून गेल्या चार वर्षांपासून धान भरडाई व वाहतूक खर्च देण्यात आलेला नाही. परिणामी राईस मिल उद्योग आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडला आहे.
- महेश अग्रवाल
सचिव, राईस मिलर्स असोसिएशन, गोंदिया