मध्यपूर्वेतील तणावाचा १५ हजार भारतीय कामगारांना फटका!

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
15 thousand Indian workers affected मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता जगभर जाणवू लागला असून त्याचे परिणाम भारतीयांवरही दिसू लागले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने अनेक उद्योग आणि कामकाज मंदावले आहे. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर गंभीर संकट उभे राहिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे पंधरा हजार भारतीय कामगारांची नोकरी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांमध्ये अनेक प्रकल्प आणि कामे थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत काम उपलब्ध न झाल्यास भारतीय कामगारांवर बेरोजगारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

 workers affected 
 
या परिस्थितीत अनेक भारतीय कामगार आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असल्याने त्यांना त्वरित मायदेशी परत येणे शक्य होत नाही. पर्यायी मार्गाने परत येण्याचा पर्याय असला तरी विमान प्रवासाचा खर्च त्यांच्यासाठी परवडणारा नाही. नोकरी नसताना वाढत्या खर्चाचा सामना करताना पुढील दिवस कसे काढायचे, याची चिंता या कामगारांना सतावत आहे. त्याचबरोबर भारतातील त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठी काळजी लागली आहे.आखाती देशांतील अर्थव्यवस्थेत भारतीयांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बांधकाम क्षेत्र, तेल आणि वायू प्रकल्प, वाहनचालक, स्वच्छता सेवा आणि घरगुती मदतनीस अशा विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कार्यरत आहेत. याशिवाय माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बँकिंग, आरोग्य सेवा तसेच हॉटेल, विक्री आणि वाहतूक व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांतही भारतीयांचे मोठे योगदान आहे.
 
 
आखाती देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या भारतीयांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतील कामगारांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. याशिवाय केरळ, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर लोक रोजगारासाठी आखाती देशांकडे जातात. आरोग्य सेवा आणि कुशल कामगारांच्या क्षेत्रात केरळमधील नागरिकांचा मोठा वाटा आहे.सध्या आखाती देशांमध्ये सुमारे नव्वद लाख ते एक कोटी भारतीय वास्तव्यास असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुमारे त्रेचाळीस लाख, सौदी अरेबियामध्ये सत्तावीस लाख, कुवेतमध्ये दहा लाख, ओमानमध्ये सुमारे आठ लाखांहून अधिक, कतारमध्ये साडेसहा लाख आणि बहरीनमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक भारतीय राहतात. मध्यपूर्वेतील हा संघर्ष आणखी काळ वाढला तर हजारो भारतीय कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे गरज भासल्यास केंद्र सरकार भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.