अमरावती गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणी परिस्थिती

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
सिरोंचा,
national highway danger सिरोंचा ते आलापल्ली या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर अमरावती गावाजवळ अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, रस्त्याच्या कडेला योग्य भराव व सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे वाहनचालकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
 

national highway danger  
सिरोंचा तालुक्यातील अमरावती गावाजवळ महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला योग्यप्रकारे मातीचा भराव करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला खोल उतार तयार झाला आहे. अशा परिस्थितीत दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आली तर एका वाहनाला बाजूला जाणे अत्यंत कठीण होते. वाहन थोडेसे जरी कडेला गेले तरी ते घसरून खाली जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अमरावती गावाजवळील या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅक्टर, दुचाकी व इतर प्रवासी वाहने ये-जा करतात. हा मार्ग सिरोंचा आणि आलापल्ली या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा असल्यामुळे वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या कडेला योग्य सुरक्षा भिंत, गार्डरेल किंवा भराव न केल्यामुळे वाहनचालकांना सतत सावधगिरी बाळगून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, national highway danger रस्त्याचे काम करताना बाजूचा भाग समतल करून मजबुती देणे आवश्यक असते. मात्र संबंधित कामामध्ये त्या बाबीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. पावसामुळे माती वाहून गेल्यास रस्त्याचा कडा आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी प्रकाशाची कमी व्यवस्था आणि रस्त्याच्या कडेला कोणतेही इशारा फलक किंवा सुरक्षा बॅरिअर नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
अमरावती गावाजवळील या धोकादायक स्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.