वर्धा,
captain-gujarkar : आज जात, धर्म, भाषा व प्रांताच्या नावावर समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न काही विघातक शती करीत आहेत. हे आपल्या देशाकरिता फार मोठे संकट असून आपल्या शत्रूच्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला घातक आहे. याचा फायदा शत्रू सहज घेऊ शकतो. म्हणूनच युवा पिढीने नेहमी सतर्क राहणे आवश्यक आहे. अश्या अवस्थेत युवा वर्गच राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष तथा एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरादरम्यान आयोजित युवा व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर स्वयंसेवकांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा शिबिर प्रमुख प्रा. डॉ. बालाजी चिरडे तर प्रमुख अतिथी तथा वते म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हेमचंद्र ससाने व प्रा. डॉ. विधु खरे दास उपस्थित होते.
कॅप्टन मोहन गुजरकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या मते ‘युवा’ या शब्दाची परिभाषा सांगितली. युवा आपल्या देशाचे शिल्पकार व निर्माता असून युवक-युवतींमध्ये भरपूर ऊर्जा व क्षमता असते, ज्याचा वापर विधायक पद्धतीने केल्यास आपल्या समाजाला आणि राष्ट्राला सशत बनविण्याकरिता महत्त्वाची भूमिका निभवू शकतात. शहीद भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, चंद्रशेखर आझाद आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या महान क्रांतिकारकांपासून प्रेरणा घेऊन देशसेवेचा मार्ग निवडला पाहिजे आणि आपल्या देशाला आगळी वेगळी दिशा दिली पाहिजे. युवक युवतींनी जात, धर्म, भाषा व प्रांत या कल्पनेच्या पलीकडे जाऊन स्वतःला केवळ ‘प्रथम भारतीय’ या भावनेने पुढे येऊन राष्ट्र सेवेला आपले सर्वोच्च कर्तव्य मानले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. बालाजी चिरडे यांनी युवा स्वयंसेवकांनी समाज सेवा व आपदा प्रबंधनबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. संचालन रासेयो स्वयंसेवक राणाप्रताप राय यांनी तर रासेयो स्वंयसेवक श्रेयांशी सतरूपा हिने आभार मानले. यावेळी एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.