विनापरवाना कोचिंग लासेसचे पेव

लासेसची तपासणी मोहीम राबविण्याची मागणी

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड,
coaching classes, शिक्षण क्षेत्रात कोचिंग लासचा वाढता प्रभाव ही आजची वास्तवता आहे. मात्र, या वाढत्या प्रवाहात नियमांचे पालन कितपत केले जाते, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारंजा शहरात सध्या कोचिंग लासचे अक्षरशः पेव फुटले असून अनेक लासेस शासन नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे यापैकी काही लासेस विना परवानगी सुरू असल्याची चर्चा शहरात होत आहे.
 

coaching classes 
शासन नियमानुसार कोचिंग लास सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेणे, योग्य जागा, सुरक्षित इमारत, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अग्निसुरक्षा उपाययोजना, स्वच्छता आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात अनेक लासेसमध्ये या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. याहून गंभीर बाब म्हणजे १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोचिंग लासमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. शालेय शिक्षणासोबत अतिरिक्त ताण निर्माण करणारी ही प्रवृत्ती विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशी चिंता शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. काही लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने वर्गखोल्यांमध्ये मोठी गर्दी होते. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो.
शिक्षणाच्या नावाखाली हा व्यवसाय वेगाने वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. शिक्षण ही केवळ व्यवसायाची संधी नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित जबाबदारी आहे. त्यामुळे शासन नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.