मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा: १० हजार गावांमध्ये...

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
अहिल्यानगर,
devendra-fadnavis : हवामान बदलामुळे शेतीवर होणारा ताण लक्षात घेत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील १० हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे, ज्यासाठी जागतिक बँकेचा सहकार्य लाभणार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि आधुनिक शेती पद्धती शिकवून पारंपरिक शेतीच्या जोखमी कमी करण्यावर केंद्रित असेल.
 
 
 
cm
 
 
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९व्या पदवीप्रदान समारंभात बोलताना फडणवीस यांनी असेही सांगितले की, फक्त कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती मदत आहे; शाश्वत समाधानासाठी टिकाऊ शेती पद्धती आणि नव्या पीकवाण्यांचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी आधुनिक संशोधन संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरेल.
 
फडणवीस यांनी अधोरेखित केले की, मागील सरकारच्या दृष्टिकोनात कृषी क्षेत्र फक्त मदत आणि पुनर्वसनपुरता मर्यादित होते, तर सध्याच्या सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून शेती अधिक सक्षम आणि नफ्याची बनवण्यावर भर दिला आहे. सिंचन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून शेती टिकाऊ करणे हा सरकारचा उद्देश आहे.