कोच्चीहून गेलेले विमान दुबईतून परतले

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
कोच्ची,
flight from Kochi returned from Dubai केरळमधील कोच्चीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईकडे निघालेलेएमिरेट्सचे विमान सोमवारी सुरक्षेच्या कारणामुळे पुन्हा कोची येथे परतावे लागले. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान पहाटे साडेचारच्या सुमारास सुमारे ३२५ प्रवाशांसह दुबईकडे रवाना झाले होते. मात्र दुबईतील परिस्थिती अचानक बदलल्याने विमानाला परतण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार हे विमान सकाळी साडेआठच्या सुमारास पुन्हा कोची विमानतळावर सुरक्षित उतरले.
 

Kochi returned from Dubai 
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्याने हा निर्णय घ्यावा लागला. परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईपर्यंत प्रवाशांना विमानातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरच पुढील उड्डाणाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्याची घटना घडल्याची माहिती समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाण सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली. या घटनेत विमानतळ परिसरात आग लागल्याचे सांगितले जाते. आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली आणि परिसर सुरक्षित केला.
 
दुबई नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आल्याचे नमूद केले आहे. प्रवाशांनी त्यांच्या उड्डाणासंबंधीची ताजी माहिती मिळवण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतरच पुढील माहिती जाहीर केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे मानले जात आहे. अलीकडील काळात विविध देशांदरम्यान वाढलेल्या संघर्षामुळे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती वाढली आहे. त्यामुळे काही आखाती देशांमध्ये वेळोवेळी हवाई वाहतुकीवर निर्बंध लादले जात आहेत.