मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावरील चित्रफीतप्रकरणी वनगुन्हा दाखल

*आरोपींचा शोध सुरु

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर, 
forest-crime-registered : मोहर्ली-पद्मापूर रस्ता ओलांडणार्‍या वाघाची अतिशय जवळून चित्रफीत काढण्याचा प्रकार 15 मार्च रोजी समोर आला असून, ही चित्रफीत समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल होत आहे. जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियम असतानाही काही लोकांनी नियम धाब्यावर बसवत वाघाच्या अगदी जवळ जाऊन चित्रीकरण केले. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने संबंधितांवर वनगुन्हा दाखल केला आहे.
 
 
jk
 
 
मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर काही लोकांनी वाहने थांबवून, रस्त्याच्या खाली उतरून, वाघाचा रस्ता अडवून पाठलाग करीत भ्रमणध्वनीद्वारे चित्रफीत काढली. या गंभीर प्रकरणाची वनविभागाने चौकशी सुरु केली आहे. वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबविणार्‍यांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असून, रस्त्याच्या खाली उतरलेल्या आरोपीवर वनगुन्हा क्रमांक 09654/211333, 15/03/2026 भारतीय वन अधिनियम 1972 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींची ओळख पटवून न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
वनगुन्ह्याची चौकशी मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहे. चित्रफीतीमध्ये असलेल्या आरोपींची ओळख पटल्यास 9834689541 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्याचे व वन्यजीवांचे भ्रमणमार्गात अडथळे न आणण्याचे आवहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.