अमली पदार्थ प्रकरणात खासदारासह ११ जण ताब्यात

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
हैदराबाद,
MP in custody in drug case हैदराबादजवळील मोइनाबाद परिसरातील एका फार्महाऊसवर झालेल्या कथित अमली पदार्थांच्या पार्टीमुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी माजी आमदार पायलट रोहित रेड्डी यांच्या फार्महाऊसवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान तेथे अमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणात तेलुगु देसम पक्षाचे खासदार पुट्टा महेश कुमार यांच्यासह एकूण अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले.
 
 
MP in custody in drug case
 
पोलिसांनी सर्व उपस्थितांची तपासणी केली असता काही जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आले. तपासणी अहवालानुसार रोहित रेड्डी यांच्यासह काही जणांनी अमली पदार्थ घेतल्याचे स्पष्ट झाले, तर खासदार महेश कुमार यांच्या तपासणीत अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तरीही चौकशीसाठी त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर खासदारासह इतर सात जणांना जामिनावर सोडण्यात आले.
 
या कारवाईदरम्यान आणखी एक गंभीर प्रकारही समोर आला. पार्टीदरम्यान उपस्थित असलेल्या एका व्यावसायिकाने दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरमधून हवेत तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या पथकावरही त्याने एक गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर आणि काडतूस जप्त करण्यात आले.या प्रकरणात रोहित रेड्डी आणि संबंधित व्यावसायिकासह तीन जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उर्वरित जणांना नोटीस देऊन चौकशीनंतर सोडण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली असून अमली पदार्थांच्या या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.