धमक्यांमुळे आयुष्य बदलले; स्वातंत्र्य गमावले!

महिला परिषदेत नुपूर शर्मा यांचे भावनिक वक्तव्य

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Nupur Sharma's statement पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर सार्वजनिक जीवनापासून दूर राहणाऱ्या माजी भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी अलीकडेच आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या. एका महिला परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांत त्यांचे आयुष्य अत्यंत वेदनादायक बनले असून त्यांना आपले स्वातंत्र्य गमवावे लागले आहे. त्यांनी असेही म्हटले की आज त्या जिवंत आहेत आणि सुरक्षित आहेत, ते फक्त देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहायांच्या संरक्षणामुळेच शक्य झाले आहे.
 
 
nupur sharma
 
सन २०२२ मध्ये ज्ञानवापी मशिदीच्या वादावर दूरचित्रवाणी चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यावर देशातील तसेच अनेक मुस्लिम देशांतील लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर त्यांना जीवघेण्या धमक्या मिळू लागल्या आणि त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर त्या बराच काळ कठोर पोलिस संरक्षणाखाली राहू लागल्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिल्या.
महिला परिषदेत बोलताना नुपूर शर्मा यांनी सांगितले की गेली चार वर्षे त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगले आहे. सततच्या धमक्यांमुळे त्यांचे सामान्य जीवन पूर्णपणे बदलले असून त्या नेहमीच कडक सुरक्षेच्या घेरात राहतात. तरीही त्या जिवंत आहेत आणि श्वास घेत आहेत, यासाठी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतात, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना त्यांनी मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की जर त्यांच्या पालकांनी त्यांना लहानपणी स्वसंरक्षणाचे शिक्षण दिले असते, तर त्या स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे अधिक चांगले संरक्षण करू शकल्या असत्या. स्त्री म्हणून जन्माला आल्यामुळे आपण कमकुवत नाही, परंतु स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी भूतकाळाशी तुलना केली. काही वर्षांपूर्वी महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या बातम्या वारंवार समोर येत असत, परंतु आज परिस्थितीत काही प्रमाणात बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी असेही सांगितले की देशात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. मुलींना शिक्षण आणि संधी मिळाल्यास त्या अधिक सक्षम होतील, असे सांगत त्यांनी पंतप्रधानांच्या “बेटी वाचवा, बेटी शिकवा” या संदेशाचा उल्लेख करत महिलांनी स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचे आवाहन केले.