जेरुसलेम,
Palestinians from Gaza मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझामधील अनेक पॅलेस्टिनी नागरिक सुरक्षित ठिकाणाच्या शोधात आपले घर सोडत आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुमारे दीडशे पॅलेस्टिनी नागरिकांना घेऊन एक विमान दक्षिण आफ्रिकेत उतरल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मे महिन्यापासून युद्धग्रस्त गाझा पट्टी सोडण्यासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना घेऊन जाणारी किमान तीन विमाने इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे.

या उड्डाणांमागील घडामोडींवर प्रकाश टाकताना असोसिएटेड प्रेसने केलेल्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली. तपासानुसार या उड्डाणांचे आयोजन एका इस्रायली गटाने केले होते. या गटाचे संस्थापक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाचे समर्थक असल्याचेही सांगितले जाते. माजी गुप्तचर अधिकारी आणि सैनिकांच्या सहभागातून चालणाऱ्या या संघटनेने “अल-मजद” नावाच्या एका आडवळणी कंपनीच्या माध्यमातून ही उड्डाणे आयोजित केली होती. दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री रोनाल्ड लामोला यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना असे मत व्यक्त केले की गाझा आणि वेस्ट बँकमधून पॅलेस्टिनी नागरिकांना बाहेर काढण्याचा एक ठराविक उद्देश या उड्डाणांमागे असू शकतो. त्यांच्या मते या हालचालींचा स्वरूप पाहता मोठ्या प्रमाणावर विस्थापन घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या उड्डाणांमध्ये सहभागी झालेल्या अनेक प्रवाशांनी मात्र सांगितले की त्यांना या प्रवासामागे नेमके कोण आहे याची माहिती नव्हती. त्यांच्यासाठी महत्त्वाचे इतकेच होते की युद्ध आणि टंचाईने त्रस्त झालेल्या गाझातून बाहेर पडण्याची संधी मिळाली. काही प्रवाशांनी सांगितले की गाझामध्ये अन्नटंचाई आणि संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून जगण्यासाठी दुसरा पर्याय उरला नव्हता. दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेल्या एका पॅलेस्टिनी व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की त्याच्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी गाझा सोडणे अपरिहार्य झाले होते. 'अल-मजद' ही कंपनी स्वतःला पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करणारी मानवतावादी संस्था म्हणून सादर करते. मात्र या उपक्रमामागील काही व्यक्ती आणि संस्थांचा इतिहास पाहिला असता त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. या गटाचे संस्थापक गिलाद आच हे इस्रायलमधील एक राखीव सैनिक असून वेस्ट बँकमधील वसाहतधारकांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.