राज्यात उद्यापासून वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Stormy winds in the state from tomorrow महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा धोका आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात. यासोबतच विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
Stormy winds
 
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्च या कालावधीत या परिस्थितीची तीव्रता आणखी वाढू शकते. त्यामुळे विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वादळी वारे, पावसाच्या सरी आणि संभाव्य गारपीट यामुळे उभ्या पिकांसह कापणी केलेल्या पिकांनाही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
 
 
सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकांची कापणी सुरू असल्याने हा हवामानाचा इशारा शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरत आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. कापणी केलेले धान्य आणि इतर पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे किंवा योग्य प्रकारे झाकून ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. जोरदार वारे, पाऊस आणि गारपिटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, या बदलत्या हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरी आणि थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा आराम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे