बोगस डॉक्टरांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक; मंत्री सामंतांची मोठी घोषणा

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
मुंबई,
bogus-doctors-uday-samant : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब भागात फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार कारवाईसाठी सज्ज झाली आहे. विधानपरिषदेत आमदार चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
 
 

uday samant 
 
 
चित्रा वाघ यांनी सभागृहात खुलासा केला की, मुंबईसह महाराष्ट्रातील काही लोक फक्त १० वी पास असूनही डॉक्टर बनून गरिबांच्या जीवाशी खेळत आहेत. चेंबूरमधील एका क्लिनिकमध्ये चुकीच्या इंजेक्शनमुळे रिक्षाचालकाचा मृत्यू झाला, तर गोवंडीमध्ये १० वी पास असलेला व्यक्ती तीन वर्षांपासून क्लिनिक चालवत आहे. नानावटीसारख्या नामांकित रुग्णालयातही बनावट कागदपत्रांवर प्रॅक्टिस होत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
 
उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, नगरविकास आणि आरोग्य विभागांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली समिती संपूर्ण राज्यभर रुग्णालयांचे सर्वे करेल, अनधिकृत क्लिनिकांचा तपास करेल आणि कारवाईसाठी सविस्तर अहवाल सादर करेल. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून दोषींवर थेट गुन्हे दाखल केले जातील. मंत्री सामंत यांनी विश्वास दिला की, गरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही बोगस डॉक्टराला सरकार पाठीशी ठेवणार नाही आणि कठोर कायदेशीर पावले उचलली जातील.