इराणविरोधात साथ द्या, अन्यथा परिणाम भोगा!

ट्रम्प यांची नाटो देशांवर टाकला दबाव

    दिनांक :16-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's pressure on NATO countries अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक राजकारणात तणाव अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना स्पष्ट इशारा देत होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा जहाज वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी अमेरिकेला मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिकेसोबत उभे राहिले नाहीत, तर त्याचे परिणाम नाटो देशांना भोगावे लागू शकतात. इराणने अलीकडेच अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणावर रोखली आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि वायूची निर्यात होत असल्याने या निर्णयाचा परिणाम आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठा आणि किमतींबाबत चिंता वाढली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी सुरू केली आहे.
 

NATO countries 
 
 
एका आंतरराष्ट्रीय आर्थिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी या संकटात सहकार्य केले नाही, तर नाटोचे भविष्य धोक्यात येऊ शकते. इराणशी संबंधित तणावामुळे त्यांनी या महिन्याच्या अखेरीस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या नियोजित बैठकीबाबतही अनिश्चितता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी चीनवरही या प्रश्नात सहकार्य करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते चीनला लागणाऱ्या तेलापैकी मोठा हिस्सा याच सागरी मार्गातून जातो. त्यामुळे या मार्गाची सुरक्षितता राखणे चीनसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. बीजिंगची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच पुढील दौऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी संकेत दिले.
 
 
 
अमेरिकेच्या अध्यक्षांनी असेही स्पष्ट केले की या सागरी मार्गाचा फायदा घेणाऱ्या सर्व देशांची जबाबदारी आहे की त्यांनी त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी. यापूर्वी त्यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन या देशांना त्यांच्या युद्धनौका पाठवून या मार्गाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले होते. ट्रम्प यांनी सातत्याने असा दावा केला आहे की होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही परिस्थितीत इराणच्या नियंत्रणाखाली राहू नये आणि ती पूर्णपणे सुरक्षित ठेवली पाहिजे. दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर या सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे. इराण, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्या दरम्यान असलेला हा सुमारे चौपन्न किलोमीटर रुंदीचा सागरी मार्ग जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या भागातील तणावामुळे अनेक देशांमध्ये ऊर्जा संकटाची भीती व्यक्त केली जात आहे.