अनिल कांबळे
नागपूर,
nagpur viral news जाती-पातीची आणि वयाची बंधने झुगारुन एका तरुणीने आणि तरुणाने कुटुंबियांचा विराेध पत्करुन पळून जाऊन प्रेमविवाह केला. दाेघांचाही सुरळीत संसार सुरु असतानाच वडिलांनी गाेडीगुलाबीने मुलीला फोन केला. तिला धुमधडाक्यात रितिरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्याचे वचन देऊन घरी बाेलावून घेतले. त्यानंतर घरात डांबून तिचा मानसिक-शारीरिक छळ करण्यात आला. शेवटी प्रियकराने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशामुळे त्या प्रेमीयुगुलांचे पुनर्मिलन झाले.
अकाेला जिल्ह्यातील बाळापूर येथील उमेश हा एका फार्मास्युटीकल कंपनीत व्यवस्थापक पदावर नाेकरी करताे. त्याला लाखात पगार आहे. तर मेघा ही एका मेडिकल स्टाेअर्सवर फार्मासिस्ट म्हणून नाेकरी करते. 2022 मध्ये त्या मेडिकलमध्ये भेट देण्यासाठी उमेश आला आणि त्याची मेघाशी मैत्री झाली. फार्मा कंपनीच्या कामानिमित्त दाेघांचे माेबाईलवर बाेलणे हाेत हाेते. तसेच काही अडीअचडण आल्यास मेघासुद्धा उमेशला फोन करुन विचारणा करीत हाेती. यादरम्यान दाेघांमध्ये चांगली मैत्री झाली. काही दिवसांनंतर दाेघेही प्रेमात पडले. दाेघांनीहा भविष्याचा विचार करीत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मेघा ही उच्च समूदायातील आणि उमेश हा कनिष्ठ समूदायातील असल्याने दाेघांमध्ये जाती-पातीची बंधने आली. तरीही दाेघांनीही प्रेमविवाह करण्याची तयारी ठेवली. दाेघांनीही आपापल्या कुटुंबियांना लग्नाबाबत माहिती दिली. उमेशच्या कुटुंबियांनी लगेच हाेकार दिला. तर मेघाच्या कुटुंबियांनी उमेशला स्विकारले नाही. त्याच्याशी लग्न लावून देण्यास विराेध दर्शवला.
पळून जाऊन केला प्रेमविवाह
मेघाला लग्नाबाबत कुटुंबियांचा विचार करुन निर्णय घेण्यास सांगितले. त्यावर मेघाने प्रेमविवाह करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. 16 जानेवारी 2026 राेजी अमरावतीमधील संत गजानन महाराज मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार दाेघांनी लग्न केले. त्यानंतर चंद्रविला ट्रस्टकडे लग्नाची नाेंदणी केली. दरम्यान, ते काही दिवस लपून राहिल्यानंतर उत्तरप्रदेशला निघून गेले. दाेघांचा संसार सुरळीत सुरु हाेता. त्यामुळे मेघाच्या वडिलांनी 31 जानेवारी 2026 राेजी अकाेल्यातील सिव्हिल लाइन्स पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली.
तू परत ये...तुझे लग्न लावून देताे
गावात बदनामीच्या भीतीपाेटी वडिलाने मेघाला फोन लावला.‘तू घरी परत ये...आम्ही तुझे थाटामाटात लग्न लावून देताे...’ अशी भावनिक साद घातली. वडिलांच्या शब्दाला मान देऊन मेघाने उमेशची समजूत घातली. त्यानंतर दाेघेही अकाेला येथे परत आले. मुलगी परत येताच वडिलांनी शब्द फिरवला.nagpur viral news मुलीला बळजबरीने गाडीत बसवून घरी नेऊन डांबून ठेवले. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच उमेशला जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा मेघापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
न्यायालयाचा आदेश आणि मेघा-उमेश एकत्र
उमेशने पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. पण पाेलिसांनी नेहमीप्रमाणे तक्रारीची दखल न घेता उमेशला हाकलून लावले. त्यामुळे उमेशने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केला. न्यायालयाने मेघाला न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश दिला. पाेलिसांनी मेघाला 10 मार्च राेजी न्यायालयात आणले. तिला न्यायालयाने विचारणा केली असता ‘मी स्वतःच्या मर्जीने उमेशसाेबत प्रेमविवाह केला. भविष्यात मला उमेशची पत्नी म्हणून राहायचे आहे.’ असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने मेघाला उमेशसाेबत जाण्यास परवानगी दिली. तसेच आईवडिलांना विराेध न करता आशिर्वाद देऊन मुलीला निराेप देण्याचा आदेश दिला.