कारंजा कृषी अधिकारी कार्यालयात बोकाळली ‘लेट लतिफ’ संस्कृती

शेतकरी त्रस्त, कार्यालयीन वेळ धाब्यावर

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड,
Karanja Agriculture Officers Office येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या उशिरा येण्याच्या सवयीमुळे शेतकर्‍यांची कामे खोळंबत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सकाळी पावणे १० ते सायंकाळी सव्वा ६ अशी अधिकृत कार्यालयीन वेळ असताना अनेक कर्मचारी तब्बल १०.३० ते ११ वाजल्यानंतर कार्यालयात दाखल होत असल्याने शेतकर्‍यांना विनाकारण ताटकळत बसावे लागत आहे.
 
 
Karanja
 
दररोज विविध योजनांबाबत माहिती, अनुदान अर्ज, पीकविमा, खत-बी बियाणे संदर्भातील कामांसाठी उन्हामुळे ग्रामीण भागातून शेतकरी सकाळी लवकर कार्यालयात पोहोचतात. मात्र, कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना परत जावे लागते किंवा पुन्हा पुन्हा फेर्‍या माराव्या लागतात.विशेष म्हणजे, कृषी हंगामाच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाचे महत्त्व अधिक वाढते. अशा काळातच कार्यालयातील शिथिलता आणि वेळेचे पालन न होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. Karanja Agriculture Officers Office शेतकरी वर्ग आधीच विविध अडचणींना सामोरे जात असताना प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडत आहे.
 
 
काही शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, आम्ही सकाळी ठरलेल्या वेळेत येतो, पण कर्मचारी उशिरा येतात. त्यामुळे आमचा दिवस वाया जातो आणि शेतीची कामेही मागे पडतात. या परिस्थितीमुळे प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. ही केवळ एका कार्यालयाची समस्या नसून शासकीय यंत्रणेत वाढत चाललेल्या शिस्तभंगाचे उदाहरण आहे. Karanja Agriculture Officers Office वेळेचे पालन, जबाबदारीची जाणीव आणि नागरिकाभिमुख सेवा ही प्रशासनाची मूलभूत अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून, वरिष्ठ अधिकार्‍यांनी अचानक तपासण्या करणे, उपस्थिती नोंद काटेकोरपणे तपासणे आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
 
 
दोन महिन्यापासून बायोमेट्रिक हजेरी यंत्र बंद
शासकीय नियमानुसार कार्यालयात कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्र (थंब मशिन) बसविण्यात आले. परंतु हे यंत्रच बंद असल्याने कोणी कधीही जावे आणि कधीही यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. Karanja Agriculture Officers Office शिवाय कोणतीही कारवाई होत नसल्याने कर्मचार्‍यांना देखील कोणाची भिती उरली नाही. त्यामुळे या कार्यालयात लेट लतिफ संस्कृती बोकाळल्याचे दिसून येत आहे.
 
 
तालुका कृषी अधिकार्‍यांकडून कर्मचार्‍यांना सावत्र वागणूक
कारंजा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासकीय कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणार्‍या व उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा सपाटा तालुका कृषी अधिकारी यांनी सुरू केला आहे. Karanja Agriculture Officers Office परंतु ही कारवाई करताना मर्जीतील काही कर्मचार्‍यांना सूट दिल्या जात असल्याचा तर नियमित काम करणार्‍या एखाद्या कर्मचार्‍याला उशीर झाल्यास नोटिस दिल्या जात असल्याचा आरोप होत असल्याने सर्वांवर सारखी कारवाई करावी अशी मागणी केल्या जात आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.