खेड,
bus-accident : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या बसचा अपघात झाला. गोव्यातील प्रयोग आटोपून संपूर्ण टीम मुंबईकडे परतत असताना हा प्रकार घडला. घाट उतरताना बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
प्राथमिक माहितीनुसार, उतारावर येताना बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले आहेत. विलास दाते यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना टाके घालावे लागले आहेत.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रिक्षामधून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. बसमधील इतर सर्व सदस्य सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.