परतवाड्यात गॅस सिलेंडचा काळाबाजार उघड

हॉटेलांवर धाड, ४ सिलेंडर जप्त

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
अचलपूर, 
black-market-of-gas-cylinders : घरगुती गॅस सिलेंडरचा उघडपणे व्यावसायिक गैरवापर होत आहे. पुरवठा विभागाने धडक कारवाई करत धारणी मार्गावरील दोन हॉटेलांवर टाकलेल्या छाप्यात चार घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. मात्र, या कारवाईने एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शहरात अजून किती ठिकाणी हा ‘गॅस घोटाळा’ सुरू आहे. निरीक्षण अधिकारी व कर्मचार्‍यांनी शेर-ए-पंजाब आणि वर्‍हाडी (कहाडी) सुगरण फॅमिली रेस्टॉरंट येथे धाड टाकली असता, घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्टपणे आढळून आले.
 
 
j
 
 
 
इराण-अमेरिका युद्धाची झळ आता सर्वसामान्यापर्यंत पोहचत आहे. एकीकडे घरगुती ग्राहकांना सिलेंडर मिळत नाही, परंतु व्यावसाईकांची मात्र नेहमीप्रमाणे खातिरदारी होतांना दिसत आहे. कारण परतवाडा शहरालगतच्या दोन हॉटेलवरील कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणांहून एकूण चार घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले असून, संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जुळ्या शहरातील अनेक हॉटेल, ढाबे आणि खाद्य व्यवसायांमध्ये अजूनही घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी तर उघडपणे ढाब्यावर गॅस वापरला जात आहे. प्रशासनाची नजर चुकवून हा प्रकार किती दिवस सुरू राहणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
 
 
पुरवठा विभागाने शहरात नियमित तपासणी मोहीम राबवण्याचा इशारा दिला असला तरी, ही कारवाई सातत्याने होणार का, की केवळ दिखावा ठरणार, असा प्रश्न आहे. घरगुती गॅस हा सर्वसामान्य नागरिकांसाठी अनुदानित दरात मिळतो. त्याचा असा गैरवापर म्हणजे थेट जनतेच्या हक्कावर डाका असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा गॅस माफियांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अन्यथा हा गैरप्रकार थांबणार नाही, असा संताप व्यक्त होत आहे.