कडक उन्हात गॅस सिलेंडर साठी नागरिकांच्या रांगा

सिलेंडरचा प्रश्न ऐरणीवर

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
कारंजा लाड,
gas cylinders शहरातील घरगुती गॅस सिलेंडर साठी नागरिकांना कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शहरातील भारत गॅस कार्यालयासमोर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसून येत असून, तापमानाचा पारा वाढत असतानाही ग्राहकांना उन्हात उभे राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या रांगेत महिला, ज्येष्ठ नागरिक, दिवसभर मजुरी करणारे कामगार यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक नागरिकांनी सकाळी लवकर येऊनही दुपारपर्यंत आपला नंबर लागत नसल्याची तक्रार केली. उन्हाच्या झळा सहन करत नागरिकांना उभे राहावे लागत असून, पिण्याच्या पाण्याची, सावलीची किंवा बसण्याची कोणतीही सोय नसल्याचे दिसून आले.
 
 
gas cylinders
 
काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच कापडी रुमाल किंवा कागदाच्या सहाय्याने उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.डिजिटल युगात ऑनलाईन बुकिंग, मोबाईल अ‍ॅप, कॉल सेंटर अशा सुविधा उपलब्ध असताना देखील नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पावती घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येणे ही चिंतेची बाब आहे. अनेक ग्राहकांनी ऑनलाईन प्रणाली नीट कार्यरत नसणे, बुकिंगनंतर वेळेवर सिलेंडर न मिळणे, किंवा माहितीच्या अभावामुळे कार्यालयात धाव घ्यावी लागत असल्याचे सांगितले. काहींनी तर ऑनलाईन बुकिंग केले तरी खात्री वाटत नाही, gas cylinders म्हणून प्रत्यक्ष जाऊनच नोंद करून पावती घ्यावी लागते, अशी खंत व्यक्त केली.या पार्श्वभूमीवर गॅस वितरकांच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहकसंख्या मोठी असताना पुरेशा मनुष्यबळाची व सुविधा व्यवस्थेची कमतरता जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टोकन प्रणाली लागू करणे, ऑनलाइन बुकिंग अधिक प्रभावी करणे, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करणे, तसेच कार्यालयाबाहेर तात्पुरती सावली, पिण्याचे पाणी व बसण्याची सोय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
 
 
नागरिकांमध्ये ऑनलाईन सेवांबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.दरम्यान, प्रशासनानेही या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. gas cylinders घरगुती गॅस ही अत्यावश्यक सेवा असताना नागरिकांना अशा प्रकारे उन्हात ताटकळत ठेवणे ही गंभीर बाब असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा येत्या काळात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शयता नाकारता येत नाही.