नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन द्यावे

मेडशी येथील शेतकर्‍यांची जिल्हाधिकार्‍याकडे निवेदनाद्वारे मागणी

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
मालेगांव,
District Collector राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला असून, त्यामध्ये नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मेडशी येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे निवेदन देत, नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना किमान दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.
 
 
District Collector
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. District Collector त्याचबरोबर नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे.या निर्णयावर शेतकर्‍यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, जे शेतकरी कर्ज नियमित भरतात त्यांना केवळ ५० हजार रुपये, आणि जे कर्ज थकीत ठेवतात त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी, हा प्रामाणिक शेतकर्‍यांवर अन्याय आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नियमित कर्ज फेड करणे हा गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करत, भविष्यात कर्ज वेळेवर फेडावे की कर्ज थकीत ठेवून माफीची वाट पाहावी, याबाबत शेतकरी संभ्रमात पडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी ५० हजार रुपयांऐवजी किमान दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करावे, अशी मागणी जोर धरत आहे.