पुलगाव-आर्वी रेल्वेसाठी खा. काळे यांचा संसदेत आवाज

    दिनांक :17-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Pulgaon-Arvi Railway संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाशी चालु असलेल्या चर्चेत खा. अमर काळे यांनी पुलगाव-आर्वी या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण करुन हा मार्ग वरुडपर्यंत दिल्ली लाईनला जोडण्याबाबत आज १६ रोजी चर्चा केली. खा. अमर काळे यांनी प्रथम पुलगाव ते आर्वी हा नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण करुन पुढे वरुडपर्यंत वाढविण्याच्या कामाला गती देऊन हे काम तात्काळ पूर्ण करुन लोकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रहपूर्वक आपली मागणी मांडली. पुलगाव ते आर्वी ही रेल्वे गाडी सन १९१७ पासून इंग्रज राजवटीत सुरू झाली व ती १९९४-९५ या काळापर्यंत चालू होती. १९९४-९५ मध्ये ही गाडी बंद करण्यात आली.
 
 
खा. काळे
 
त्यामुळे आर्वी-आष्टी-कारंजा हा भाग रेल्वे सुविधांपासून वंचित झाला. हा मार्ग ब्रॉडगेज करुन पुढे वरुडपर्यंत वाढविण्याची मागणी झाली. या मागणीला प्रतिसाद म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२४ मध्ये निवडणुकीच्या प्रचारात तळेगाव येथे आले असताना या मार्गाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते, अशी आठवण खा. काळे यांनी करुन दिली. तसेच या मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली. Pulgaon-Arvi Railway या मार्गावरून रेल्वे सेवा सुरु झाल्यास मुंबई किंवा दक्षिणेकडून येणार्‍या लोकांना व्हाया नागपूर-दिल्ली न जाता थेट या मार्गाने दिल्लीला जाता येईल. तसेच पुलगाव येथे मिल्ट्री डेपो असून हा मार्ग सुरू झाल्यास पुलगाव येथील मिल्ट्री डेपो व मध्यप्रदेशातील आमला मिल्ट्री डेपो या दोन मिल्ट्री डेपोमधील लष्करी साहित्याचे दळण-वळण आर्वी-पुलगाव-वरुड मार्गाने झाल्यास रेल्वेच्या १४५ किमीच्या अंतर कमी होणार आहे.
 
 
एवढेच नाही तर दारुगोळा वाहतुकीसाठी हा मार्ग मिल्ट्री प्रशासनाच्या मते अत्यंत सुरक्षेचा समजल्या जातो व हा अनुभव सन १९७१ मध्ये त्यांनी घेतला आहे. त्यावेळी रेल्वे लाईन नसल्यामुळे व पुलगाव डेपोमधील साहित्य तातडीने आमला डेपोला हलवायचे असल्याने नाईलाजाने ही वाहतूक रस्ता मार्गाने करावी लागली होती. Pulgaon-Arvi Railway त्यामुळे या बाबी लक्षात घेता या मार्गाचे काम तातडीने करण्यात यावे अशी खा. काळे यांनी संसदेत मागणी केली. तसेच बंद केलेल्या गाड्या पूर्ववत सुरू करुन नागपूर बडनेरा व नागपूर हिंगणघाट या दरम्यान बंद केलेले थांबे पूर्ववत करण्यात यावे अशी विनंती केली.